नाशिक, 10 सप्टेंबर : महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारातून (maharashtra sadan scam) राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा 'मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खामोशी से सूनता हुं, जबाब देने का हक मैने वक्त को दे रखा हैं' अशा शायराना अंदाजात भुजबळ यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं. तसंच, तुमच्याही भुजबळ करू हे वाक्य आता बदलावे लागेल, असा टोलाही भुजबळांनी भाजपला लगावला.
महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारातून मुक्तता झाल्यानंतर आज पहिल्यांदाच भुजबळ आपल्या होमग्राऊंड नाशकात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून भुजबळ यांचं स्वागत केलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना भुजबळ यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
'आज शुभदिनी नाशकात आलोय, त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना आनंद होणारच आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मन जळत होतं. आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, कार्यकर्त्यांना खाली पाहावं लागेल, याचं दुःख होतं. तुरुंगात असतांना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे' अशी भावनाही भुजबळांनी व्यक्त केली.
T20 World Cup 2021 : विराट नाही तर या खेळाडूमुळे अश्विनचं 4 वर्षांनी कमबॅक!
'तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो. विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो, त्यावेळी थोडं जास्त बोललं जातं. त्यातून काही जण दुखावले जातात. त्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केला जातो, आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही पडले. राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चालली आहे, असं म्हणत भुजबळांनी भाजपवर निशाणा साधला.
'आता लोक हुशार झाली आहे, जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झालंय. केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू, हा वाक्यप्रचार झाला होता, आता तो बदलावा लागेल, असंही भुजबळ म्हणाले.
दीड लाखांच्या सर्जरीमुळे वाचलं माकड; प्राण्यावर पहिल्यांदाच झालं माणसाचं ऑपरेशन
'लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ, माध्यमांमुळे आजकाल सर्वांना लगेचचं सर्व कळतंय. जनता सब जानती है. गॅस किती स्वस्त झाला आहे, पेट्रोल किती स्वस्त झालंय हे कळतंय. राष्ट्राची संपत्ती किती वाढतेय, काय होतेय, कोण विकतय कोण खरेदी करतंय, हे सर्वांना सर्व कळतंय' असं म्हणत भुजबळ यांनी अंजली दमानिया यांना टोला लगावला.
तसंच, 'महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना निवडणुकांमुळे शिळ्या कढीला ऊत आणला गेला. आता नाशिकला आले काय किंवा कुठेही गेले काय, काय झालं? माध्यमांमध्ये किती महत्व मिळालं?' असं म्हणत भुजबळांनी किरीट सोमय्यांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.