नागरिक नाल्यात शोधत होते साप; अचानक वाहत आला तरुणीचा मृतदेह, परिसरात खळबळ

नागरिक नाल्यात शोधत होते साप; अचानक वाहत आला तरुणीचा मृतदेह, परिसरात खळबळ

एक अल्पवयीन तरूणी नाल्यात वाहून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

जळगाव, 18 ऑगस्ट : जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील शामराव भागात एक अल्पवयीन तरूणी नाल्यात वाहून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिक नाल्यात साप पाहत असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक त्यांनी तरुणीला जागं करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याकडून काहीही प्रतिसाद नसल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हरीविठ्ठल नगरातील नाला दुथडी भरून वाहत आहे. शामराव नगर परिसरातील नाल्यात एक साप दिसल्याने परिसरातील नागरिक घाबरले होते. अनेकजण साप पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते आणि नाल्यात पाहत होते. त्याच वेळी या नाल्यात एक १५-१६ वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत वाहत आली. नागरिकांचे लक्ष जाताच त्यांनी लागलीच परिसरातील एका डॉक्टरांना बोलविले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आलं.

हे ही वाचा-तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, Suicide Note मधून समोर आलं धक्कादायक कारण

परिसरातील काही तरुणांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, तरुणीकडून काहीही प्रतिसाद नसल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणी अंती तिला मृत घोषित करण्यात आले. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीच ओळख पटली असून हरीविठ्ठल नगरातील रहिवासी असलेली गायत्री सोनवणे असून कालपासून ती बेपत्ता असल्याचे समजते.

अद्याप या मृत्यूमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 18, 2021, 10:39 PM IST

ताज्या बातम्या