Home /News /nashik /

पुतण्याची काकावर कुरघोडी? राज ठाकरेंनी उभारलेल्या शस्त्र संग्रहालय परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान

पुतण्याची काकावर कुरघोडी? राज ठाकरेंनी उभारलेल्या शस्त्र संग्रहालय परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय उभारलं आहे त्याच प्रांगणाच्या उर्वरित जागेत शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान उभारलं जात आहे.

नाशिक, 28 जानेवारी : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय उभारलं आहे त्याच प्रांगणाच्या उर्वरित जागेत बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान उभारलं जात आहे. या उद्यानात बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रांची आर्ट गॅलरी, त्यांच्या भाषणाची ध्वनिफिती, चित्रफिती आणि मुलाखतींचा अमुल्य ठेवा असलेलं दालन असणार आहे. तसेच, बाळासाहेबांचे नाटकावरील प्रेम विचारात घेऊन सुसज्ज असं 200 आसनी ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याच प्रांगणात मनसेने शस्त्रसंग्रहालय उभारलं होतं. या संग्रहालयात दिवंगत इतिहासकार बाळासाहेब पुरंदरे यांनी शिवकालीन शस्त्र दिले होते. हे संग्रहालय तिथे असताना त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी उद्यान बनविण्याची कल्पना अंमलात आणल्याने पुतण्याची काकावर कुरघोडी? अशा चर्चांना उधाण आलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमात भाषण करताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला. तसेच "बाळासाहेब यांचा नातू म्हणून मला इथे येणं गरजेचं होतं. शिवसेनेचा मंत्री, किंवा नेता म्हणून नव्हे नातू म्हणून आलो आहे. धगधगती आग म्हणजे बाळासाहेब ठाकरे", असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. (किराणा दुकानांना वाईन विकण्याची परवानगी, संभाजी भिडेंची उपाहासात्मक टीका) यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या कामांचं कौतुक केलं. "आमच्या सर्वांच्या दृष्टीने आजचा दिवस आनंदाचा आहे. बाळासाहेबांचा वाढदिवस जसा साजरा करत होतो तशी त्यांची जयंती देखील साजरी करतो. बाळासाहेबांचं वृक्षप्रेम देखील आपण बघितलं आहे. त्यांनी 200 वर्षांपूर्वीचं झाड वाचवली आहेत. आदित्य ठाकरेंचं पर्यावरण मंत्री म्हणून काम चांगलं आहे. पर्यावरण आणि पर्यटन विभागात आदित्य ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतले. महाराष्ट्रात पर्यटनाच्या माध्यमातून खूप काम करण्याजोगं आहे", असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरेंकडून आदिवासी पाड्यातील लोखंडी पुलाचं उद्घाटन दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज खरशेत येथील आदिवासी पाड्याला भेट देत शिवसेनेच्या वतीने बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाचं उद्घाटन केलं. या भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचं कौतुकही केलं. शासनाकडून आदिवासी पाड्यांवर पाणी योजनेसह रस्त्यांचं आणि इतर विकासकामांच्या संदर्भात उद्घाटन आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील शेंद्री पाडा येथील गावातील पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरतीच वृत्तांकन 'न्यूज 18 लोकमत'ने समोर आणलं होतं. त्यानंतर आता शासन दरबारी याची दखल घेत त्या ठिकाणी स्वतः पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देत तेथील ग्रामस्थांची संवाद साधत विकासकामांच्या संदर्भात आश्वासन दिलंय. लवकरच जिथे पाण्याची आणि रस्त्यांची आवश्यकता आहे तिथे महाविकास आघाडीच्या वतीने सर्वतोपरी पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही आश्वासन यावेळेला आदित्य ठाकरे यांनी दिले. दरम्यान यानंतर येथील ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे आपल्या मागण्या मांडत आमच्या पिण्याची पाण्याची आणि रस्त्याची सोय करा, असं गाऱ्हाणं गायलं. यासोबतच खरशेत आणि शेंद्री पाडा येथील ग्रामस्थांनी न्यूज 18 लोकमतचे देखील आभार मानले.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या