यवतमाळ, 13 ऑगस्ट : फक्त स्वप्न पाहून काहीच निष्पन्न होत नसतं, तर ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी चिकाटीची गरज असते. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुण शेख इस्माइल उर्फ मुन्ना शेख एक एक वस्तू जोडत घरात हेलिकॉप्टर तयार केलं होतं. मात्र जेव्हा ट्रायलची वेळ आली तेव्हा वरील फॅन तुटला व डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ('Munna Helicopter dream unfulfilled)
व्यवसायाने वेल्डर आणि 8 वी नापास मुन्ना शेख याची कल्पनाशक्ती पाहून लोकांना थ्री इडियट्सच्या रँचोची आठवण यायची. 2 वर्षांच्या प्रयत्नानंतर इस्माइल उर्फ मुन्ना शेख याचं स्वप्न 11 ऑगस्टला पूर्ण होणार होतं. 10 ऑगस्टच्या रात्री इस्माइलने स्वत: तयार केलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल सुरू केली. इंजिन जमिनीवर सुरू झालं आणि इंजिन 750 एम्पीयरवर सुरू होतं. सर्व व्यवस्थित सुरू झालं होतं. मात्र अचानक हेलिकॉप्टरचा (Helicopter Accident) मागचा पंखा तुटला आणि मुख्य पंख्याला आदळला. यानंतर तो पंखा इस्माइलच्या डोक्यावर जाऊन आदळला आणि सर्व स्वप्नांची राखरांगोळी झाली. पंखा डोक्याला लागल्यामुळे इस्माइलचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा-हेलिकॉप्टर बनविण्याऱ्या फुलसावंगीच्या रँचोचा अपघाती मृत्यू
त्याला हेलिकॉप्टरच बनवायचं होतं. आणि पूरपरिस्थितीत नागरिकांचा बचाव करायचा होता. घर चालविण्यासाठी इस्माइल वेल्डिंगच्या दुकानात काम करीत होता आणि रात्री उशिरा हेलिकॉप्टरचं काम करीत असायचा. त्याचं शिक्षण 8 वीपर्यंत झालं होतं, मात्र त्याची स्वप्न खूप मोठी होती. त्याला आकाशात उडायचं होतं. त्याचं स्वप्न अवघं पूर्णही झालं होतं. त्याने स्वत: हेलिकॉप्टर तयार केलं होतं. या हेलिकॉप्टरला मुन्ना हेलिकॉप्टर म्हणायचा. मात्र आपलं स्वप्न सत्यात उतरताना तो पाहू शकला नाही. हे हेलिकॉप्टर त्याने कारचं इंजिन आणि उरलेल्या वस्तूंमधून तयार केलं होतं. आणि 15 ऑगस्ट रोजी सर्वांसमोर हे उडवू इच्छित होता. पोलिसांनी सध्या या प्रकरणात ADR दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Yavatmal news