Home /News /nagpur /

Nagpur Corona : नागपुरात कोरोनाती तिसरी लाट धडकली, एकाच दिवसात दुप्पट रुग्णवाढ

Nagpur Corona : नागपुरात कोरोनाती तिसरी लाट धडकली, एकाच दिवसात दुप्पट रुग्णवाढ

नागपुरात कोरोनाबाधितांचा आजचा आकडा (Nagpur Corona Cases) थेट 404 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे काल हाच आकडा 196 इतका होता. एकाच दिवसात तब्बल दुप्पट रुग्णवाढ झाल्याचं चित्र आहे.

नागपूर, 5 जानेवारी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) नागपूरकरांनी किती यातना सोसल्या आहेत, याची कल्पना देखील करता येणार नाही. नागपुरात कोरोनाच्या (Nagpur Corona) दुसऱ्या लाटेच्यावेळी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये बेड्सदेखील मिळत नव्हते. रुग्ण अक्षरश: रुग्णालयाबाहेर बेड मिळेल या आशेने फुटपाथवर झोपायचे. तो विदारक भूतकाळ प्रत्येक नागपूरकरासह महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी झालेली आटापिटा कधीच विसरता येणार नाही. इतका आटापिटा करुनही अनेकांनी जवळची माणसं गमावली. हे संकट काही दिवसांपासून ओसरत असल्याचं वाटत असताना आता पुन्हा उभं ठाकलं आहे. नागपुरात तर कोरोनाने गुणाकारच सुरु केल्याचं दृश्य आहे. कारण नागपुरात कोरोनाबाधितांचा आजचा आकडा थेट 404 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे काल हाच आकडा 196 इतका होता. एकाच दिवसात तब्बल दुप्पट रुग्णवाढ झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाची देखील धाकधूक वाढली आहे. नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट पोहोचली, पालकमंत्र्यांची माहिती कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना परिस्थितीची माहिती दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केल्या जात आहेत याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. "नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी मी नागरिकांना विनंती करतो. नागपूर कोरोना रुग्णसंख्येत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषध याबाबतीत प्रशासन सज्ज आहे. अजून डेल्टा संपलेला नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागपुरात इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", असं नितीन राऊत यांनी सांगितली. हेही वाचा : Alert! पुण्यातही कोरोनाची तिसरी लाट? 100 वरुन रुग्णसंख्या थेट 1800 च्या घरात नागपुरात नवी नियमावली जारी "राज्य सरकारच्या पुढील निर्देशानुसार नवीन निर्बंध लावले जातील. जो नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोविड प्रतिबंधात्मक औषधांचा प्रोटोकॉल कसा असायला हवा याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय कार्यालयात येतांना अधिकारी, कर्मचारी आणि इतरांना RTPCR टेस्ट अहवाल बंधनकारक असेल. RTPCR अहवालाशिवाय कोणालाही शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. बाजारपेठेत, आठवडी बाजारात टेस्टिंगची व्यवस्था केली जाईल. शहरातील व्यापारीवर्गासोबत चर्चा केली जाईल", अशी माहिती नितीन राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारांच्या पार महाराष्ट्रात आज दिवसभरात 26 हजार 538 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 331 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96.55 टक्क्यांवर पोहोचलं आहे. हेही वाचा : भयंकर! Omicron मुळे मुलाची अशी अवस्था; टेस्ट केल्याच्या 7 दिवसात दृष्टीच गेली! राज्यात दिवसभरात ओमायक्रोनचे 144 नवे रुग्ण राज्यात दिवसभरात ओमायक्रोनच्या 144 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी मुंबईतील 100 रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नागपुरातील 11 रुग्णांचा समावेश आहे. तसेच ठाणे आणि पुणे मनपा हद्दीत 7 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरला 5, अमरावती, उल्हासनगर, भिवंडी महापालिका हद्दीत प्रत्येकी दोन नवे ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच पनवेल आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ  मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने तर आज पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेचाही रेकॉर्ड मोडला आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 15 हजार 166 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारं आहे. प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे.
पुण्यात दिवसभरात तब्बल 1805 नवे रुग्ण
पुण्यात गेल्या 24 तासात फक्त पुण्यात तब्बल 1 हजार 805 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई आणि पुणे शहर सर्वाधिक बाधित ठरले होते. त्यानंतर आतादेखील हे दोन मोठी शहरं मोठ्या प्रमाणात बाधित ठरताना दिसत आहेत. दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला तरी मृत्यूच्या आकड्यांमध्ये सध्यातरी वाढ झालेली नाहीय. पुण्यात आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालीय. तर 131 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या