Home /News /nagpur /

स्टेशनबाहेर विकायचे संत्री, कोरोनाच्या संकटात 400 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवले आणि झाले 'प्यारे' खान

स्टेशनबाहेर विकायचे संत्री, कोरोनाच्या संकटात 400 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवले आणि झाले 'प्यारे' खान

400 कोटींपेक्षा अधिकची त्यांची कंपनी आहे. पण शून्यातून सुरुवात केलेली असल्यानं त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळंच त्यांनी लगेचच गरजुंना मदतीसाठी पुढाकार घेतला.

    नागपूर, 27 एप्रिल : देशावर आलेलं कोरोनाचं संकट मोठं आहे यात शंका नाही. मात्र सर्वांनी मिळून सामना करायचं ठरवल्यास ते सहज परतवूनही लावता येऊ शकतं. नागपुरात याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. रुग्णांचा ऑक्सिजन अभावी श्वास कोंडू लागला त्यावेळी एक उद्योजक समोर आले. त्यांनी समाजित कर्तव्य पार पाडत लोकांना ऑक्सिजन पुरवला ( oxygen supply in Nagpur hospitals) आणि अनेकांचे प्राण वाचवत ते सर्वांचे 'प्यारे' बनले. (वाचा-ऑक्सिजन निर्मितीत अडचणी; जाणून घ्या कच्च्या मालासह, प्लांटसाठी किती खर्च लागतो) नागपूरमध्ये देवदूत बनून समोर आलेल्या या उद्योजकांचं नाव आहे प्यारे खान. प्यारे खान लोकांचे प्राण वाचवण्यासाठी नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करतात. त्यांनी आतापर्यंत या माध्यमातून सुमारे 400 मेट्रिक टन ऑक्सिजनचा (400 metric ton oxygen) पुरवठा विविध रुग्णालयांना केला आहे. नागपूरची आरोग्य व्यवस्थेची स्थिती फारशी चांगली नसताना आणि लोकांना जेव्हा गरज होती, तेव्हाच प्यारे खान यांनी ही मदत केली. त्यासाठी त्यांचे 85 लाख रुपये खर्च झाले. सरकारनं त्यांना ही रक्कम देऊ केली. मात्र प्यारे खान यांनी ती स्वीकारली नाही. मानवतेची सेवा करण्यासाठी हे सर्व केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. (वाचा-कोरोनावर मात करून परतली पत्नी, पतीनं स्वतः औक्षण करत केलं स्वागत) प्यारे खान हे नागपुरातील मोठे उद्योजक आहेत. पण त्यांची सुरुवात अगदी सामान्यांप्रमाणे झाली होती. नागपूरच्या रेल्वे स्थानकाबाहेर ते एकेकाळी संत्री विकायचे. रिक्षाही चालवली. पण त्यांनी परिश्रमाने मोठा व्यवसाय उभा केला. आश्मी रोड कॅरिअर्स नावाची त्यांची ट्रान्सपोर्ट कंपनी असून त्यांच्याकडे जवळपास 300 ट्रक आहेत. 400 कोटींपेक्षा अधिकची त्यांची कंपनी आहे. पण शून्यातून सुरुवात केलेली असल्यानं त्यांना परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळंच त्यांनी लगेचच गरजुंना मदतीसाठी पुढाकार घेतला. खान यांनी 750 हून अधिक ऑक्सिजन सिलिंडर रुग्णालयांना दिले आहेत. त्यामध्ये गडकरींनी दिलेल्या 360 सिलिंडरचाही समावेश आहे. दुसऱ्या राज्यांतील रायपूर, रुरकेला आणि भिलईमधून स्वतःच्या टँकरमध्ये ते ऑक्सिजन भरून आणतात आणि या रुग्णालयांना पुरवतात. भविष्यात गरज लागल्यास परदेशातून टँकर विमानाद्वारे मागवण्याचीही त्यांची तयारी आहे. अशा संकटकाळात ऑक्सिजनसारखं दान करता येणं हे मोठं समाधानाचं असल्याचं खान यांचं म्हणणं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Nagpur, Oxygen supply

    पुढील बातम्या