नागपूर, 25 जून: राज्याचे माजी गृहमंत्री (Former Maharashtra Home Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) छापे टाकलेत.
खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील एका महिला सदस्यांची चौकशी सुरू आहे. गेल्या काही महिन्यात या महिला सदस्याच्या फोन वरून संशयास्पद फोन केले गेल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान अनिल देशमुख नागपुरात (Nagpur) नसून ते मुंबईत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ते मुंबईतही नसल्याची माहिती मिळतेय. कारण अनिल देशमुख यांचं मुंबईतील निवासस्थानीही ईडी दाखल झाली आहे. गृहमंत्री असतानाचा अनिल देशमुखांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर ईडीनं छापा मारला आहे. तसंच वरळी येथील घरावरही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र ते तिथेही नसल्याचं समजतंय. अनिल देशमुख पुण्यात आहेत का? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही.
हेही वाचा- मोठी बातमी: अनिल देशमुखांच्या घराला केंद्रीय पथकाचा घेराव
ही कारवाई करण्यासाठी गुरुवारी रात्रीच मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. शुक्रवारी सकाळी 7 वाजता स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थान तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले. यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा ईडी अधिकाऱ्यांसोबत आहे. त्यात सीआरपीएफच्या महिला बटालियनचाही समावेश होता. 16 जूनला ईडीच्या तीन पथकांनी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले होते. या छाप्यानंतर लवकरच देशमुख यांच्याकडेही ईडीचे अधिकारी झाडाझडती घेण्याची शक्यता बळावली होती. त्या अनुषंगानेच ही कारवाई आहे.
Maharashtra: Enforcement Directorate (ED) raids former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's residence in Nagpur, in connection with an alleged money laundering case.
Visuals from outside his residence. pic.twitter.com/PD69rBSOsv — ANI (@ANI) June 25, 2021
100 कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडी सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. 25 मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Maharashtra, Mumbai, Nagpur