कोरोना नियमांना तिलांजली देत नागपुरात काढली लग्नाची वरात; 50 हजाराचा दंड

कोरोना नियमांना तिलांजली देत नागपुरात काढली लग्नाची वरात; 50 हजाराचा दंड

लग्नासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नवरदेवाला 50 हजाराचा दंड ठोठावला आहे. 4 मे रोजी नागपूरच्या लालगंज भागातील हरबान सिंग समुद्र यांचे लग्न होते.

  • Share this:

नागपूर, 07 मे: राज्यात कोरोना स्थिती (Corona in Maharashtra) अतिशय विदारक असून अजूनही दिवसा साठ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. नागरिकांनी कोरोना नियम पाळून कोरोना स्थिती हाताळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात असले तरी अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मर्यादित लोकांच्या उपस्थित लग्न करणे बंधनकारक असताना एका महाभागाने चक्क लग्नाची वरात काढल्याचा प्रकार नागपुरात (Nagpur Corona Update) समोर आला आहे.

प्रत्येकाला आपले लग्न धूम धडाक्यात करण्याची इच्छा असते, मात्र कोरोनाकाळात अनेकांना या स्वप्नावर पाणी फेरावे लागले. मात्र, काही लोक या काळात पण धाडस दाखवतात आणि मग ते अंगलटी येते. नागपूरमधील असाच एक विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

नागपूरमध्ये कोरोना निर्बंधात लग्नाची वरात काढणे एका नवरदेवाला चांगलेच महाग पडले आहे. पालिकेला नवदेवाच्या या धाडसाची माहिती मिळताच पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 50 हजाराचा दंड ठोठावला. 4 मे रोजी नागपूरच्या लालगंज भागातील हरबान सिंग समुद्र यांचे लग्न होते. लग्न घरी जरी असले तरी लग्नासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. लग्नाच्या सजावटीसाठी, रोषणाई, बँडबाजा सर्व गोष्टींचे आयोजन करत लग्नाला वऱ्हाडी म्हणून 100 च्या वर लोक बोलावले. सायंकाळी लग्नाला सुरुवात झाली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, बँड बाजाच्या तालावर वऱ्हाडी नाचत होते. कोणाच्याही ध्यानी-मणी नसताना पालिकेचे उपद्रव विरोधी पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी नवरदेवाला बोलावून तुम्ही नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगितले. त्यांनतर वऱ्हाडी पालिकेच्या कर्मचार्यांसोबत हुज्जत घालू लागले.

हे वाचा - हृदयद्रावक! पतीला वाचवण्यासाठी त्या मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पण कोरोनानं हिरावलं सौभाग्य

पालिकेच्या नियमानुसार लग्न सोहळ्यात फक्त 20 लोक उपस्थित राहू शकतात व लग्न सोहळा तुम्हाला दोन तासांच्या आत उरकावा लागतो. मात्र, या लग्न सोहळ्यात वऱ्हाडींची संख्या 100 च्या वर होती व वेळेने देखील मर्यादा ओलांडली होती. मात्र, नातेवाईक व वऱ्हाडींची हुज्जत सुरू असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नवरदेवाला दंडाची पावती देऊन निघून गेले. दुसऱ्यादिवशी नवरदेव थेट वकील घेऊन पालिका कार्यालयात पोहचले, मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नियमावली वाचून दाखवल्याने नवरदेवाला मुकाट्याने पन्नास हजाराचा दंड भरावा लागला. एखाद्या नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात बँडबाजा वाजवून वराद काढण्यासाठी पन्नास हजाराचा दंड झाल्याची ही नागपूरमधील पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर तरी लग्न करणारे कोविड नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

हे वाचा-कोरोनाला या गावकऱ्यांनी वेशीवरच रोखलं! आत्तापर्यंत एकही COVID-19 Positive नाही

नागपूर जिल्ह्यात (Nagpur Corona Update) सध्या चित्र बदलत असून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सात हजारांच्या सरासरीत पाच दिवसांत घसरण झाली आहे. मंगळवारी 4182 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 7 हजार 349 जणांनी कोरोनावर मात केले आहे. यामध्ये बाधितांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचा (3169) आकडा वाढत आहे. यात सक्रीय रुग्णांच्या संख्येत पाच दिवसांत 7 हजाराने घट झाल्याने आशादायी चित्र निर्माण होताना दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे नागरिक याप्रकारे बेजबाबदार वागत असल्याने कोरोना फैलाव आणखी पसरण्याची शक्यता आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 7, 2021, 4:22 PM IST

ताज्या बातम्या