मराठी बातम्या /बातम्या /nagpur /बाजारात 'सीडबॉल'चा धमाका; हा फटका लावताच यातून उगवतात झाडं आणि भाज्या!

बाजारात 'सीडबॉल'चा धमाका; हा फटका लावताच यातून उगवतात झाडं आणि भाज्या!

(फोटो- दिव्य मराठी)

(फोटो- दिव्य मराठी)

सध्या बाजारात पर्यावरणपूरक फटाक्यांची चर्चा सुरू आहे. हे फटाके लावल्यानंतर यातून झाडं आणि भाज्या उगवतात.

नागपूर, 01 नोव्हेंबर: देशातील वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदुषणासोबत सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये तर संपूर्ण राज्यात फटक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तर देशात अन्य ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून कमी-अधिक प्रमाणात फटाक्यांवर निर्बंध लादली जात आहेत. फटाक्यांच्या कर्कश आवाजाचा लहान मुलांना आणि वृद्धांना जास्त त्रास होतो. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालावी, यासाठी पर्यावरणवादी आग्रही असतात. पण सध्या बाजारात वेगळ्याच पर्यावरणपूरक फटाक्यांची चर्चा आहे.

हे पर्यावरणपूरक फटाके तुम्ही कितीही घेतले तरी तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही. कारण हे फटाके लावल्यानंतर, यातून विविध प्रकारची झाडं आणि पालेभाज्या उगवतात. असे हे भन्नाट पर्यावरणपूरक फटाके पर्यावरणवादी कार्यकर्ती श्वेता भट्टड यांनी तयार केले आहे. त्यांनी तयार केलेल्या या फटाक्यांना आता बाजारात हळुहळू मागणी वाढताना दिसत आहे. त्यांच्या या उपक्रमाचं नाव 'सीडबॉल' असं आहे.

विशेष म्हणजे, पर्यावरणवादी कार्यकर्त्या श्वेता भट्टड यांच्या टीमने गेल्या 10 हजार फटाक्यांचे दीड हजार सेट तयार केले होते. यातील 8 सेटची विक्री गेल्याच वर्षी झाली आहे. फटाक्यांच्या या सीडबॉलची किंमत 299 ते 860 रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या पारडसिंगा गावात श्वेता आणि त्यांची टीम पर्यावरण रक्षणासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवते. सीडबॉल देखील श्वेता यांचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे.

हेही वाचा-मुलांची दिवाळीही बनवा रंगतदार, फटाक्यांशिवाय अशी करा एन्जॉय

सीडबॉलचे फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात जाणारा कागद खराब कागदांवर प्रक्रिया करून बनवला जातो. या उपक्रमात आता अनेक लोकं स्वत:हून सहभागी होत आहेत. तसेच आसपासच्या सात गावातील जवळपास 100 महिलांना अशाप्रकारचा सीडबॉल बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामुळे संबंधित महिलांना दिवसाला 250 ते 300 रुपये रोजगारही मिळत आहे.

हेही वाचा-दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, LPG Gas Cylinder च्या दरात वाढ

पारडसिंगा येथे ग्राम आर्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून बनलेल्या या फटाक्यांना सहजतेने कुठेही पेरता येऊ शकतं. हे फटाके पाण्यात भिजवून जमिनीवर ठेवले की त्यातील बिया जमिनीत पेरल्या जातात. त्यानंतर आवश्यक तेव्हा पाणी दिलं की त्यातून झाड किंवा भाज्या उगवतात. लंवगी फटाक्यांमध्ये टोमॅटो, गवार, मिरची तर लक्ष्मी बॉम्बमध्ये आपटे व भेंडिचे बी आहेत. यासोबत अन्य विविध प्रकारच्या फटाक्यांमध्ये मुळा, घोळ, पालक, लाल चवळी, अंबाडी, काकडी, कांदा आणि वांगे अशा विविध प्रकारच्या बिया आहेत.

First published:

Tags: Nagpur