नागपूर, 24 जुलै: शुक्रवारी रात्री नागपूरात (Nagpur) दुहेरी हत्याकांडानं (Double murder) खळबळ उडाली आहे. जुगार आड्ड्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्यानंतर, मृत तरुणाच्या काही मित्रांनी मुख्य आरोपीला त्याच ठिकाणी आणून त्याचीही हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, स्वयम नगराळे (वय -24) आणि शक्तिमान ऊर्फ शिवम् गुरुदेव (वय-24) अशी हत्या झालेल्या तरुणांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी परिसरातील कौशल्यानगरात एका जुगार अड्डा आहे. या जुगार अड्ड्यावर मृत स्वयम आणि शक्तीमान यांच्यात मागील काही काळापासून वाद सुरू होता. याच वादातून शक्तीमान यानं स्वयमच्या हत्येचा कट रचला. यातून आरोपी शक्तीमान ऊर्फ शिवम् गुरुदेवने आपल्या तीन मित्रांच्या मदतीनं स्वयमचा धारदार शस्त्रानं वार करत खून केला.
हेही वाचा-साहेब, तुमचे सीसीटीव्ही बंद आहेत; चोरानेच पोलिसांची केली पोलखोल, नागपूरातील घटना
स्वयमची हत्या केल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत तीन आरोपींना ताब्यातही घेतलं. पण मुख्य आरोपी शक्तीमानचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
हेही वाचा-धक्कादायक! नागपुरात तरुणांचा दारू पिऊन राडा; विरोध करणाऱ्यावर थेट गोळ्या झाडल्या
दरम्यान, स्वयमची हत्या झाल्याचं कळताच, मृत स्वयमच्या काही मित्रांनी आरोपी शक्तीमानचं त्याच्या मामाच्या घरातून अपहरण केलं. तसेच त्याला जबरदस्ती करत दुचाकीवर बसवलं आणि स्वयमची ज्याठिकाणी हत्या झाली होती त्याच ठिकाणी आणलं. याठिकाणी आणल्यानंतर मृत स्वयमच्या मित्रांनी शक्तीमानचीही हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी शक्तीमानच्या तीन मित्रांना अटक केली असून स्वयमच्या मित्रांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang murder, Nagpur