नागपूर, 04 जून: राज्यातल्या अनलॉकच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) चिमटा काढला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे, अस म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेतील 5 महत्त्वाचे मुद्दे
राज्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करताहेत. कोणत्याही सरकारमध्ये पॉलिसी डिसीजन घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एखाद्यावेळी मुख्यमंत्री अशा घोषणा करण्यासाठी मंत्री नेमतात आणि ते मंत्री सरकारच्या लाईनवर भाष्य करतात. पण या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच पाच मंत्री घोषणा करत असतात. विशेष म्हणजे प्रत्येक मंत्री घोषणा करून ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचं सांगत आहेत.
प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावं. त्यामुळे कालचा गोंधळ जरा जास्तच झाला आहे. याआधीही अनेकदा गोंधळ झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधनं आणू नये पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचं म्हणणं आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे.
राज्य सरकारने आधी अनलॉकची घोषणा केली. त्यानंतर घुमजाव केल्यानं आम्हाला अनेकांचे फोन आले. लॉकडाऊन आहे की नाही आम्हाला विचारण्यात आलं. मात्र, आमच्याकडेही त्याचं उत्तर नव्हतं. लॉकडाऊनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊननंतर काल लोकांची उत्सुकता वाढली होती. उत्कंठाही वाढली होती. संभ्रमही निर्माण झाला आणि निराशाही झाली. कालच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला.
काल अनलॉकची घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटलं की सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असं वाटलं. अनेक दुकानदारांचा 7 ते 2 या वेळेला विरोध असून 9 ते 4 करावी अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. सरकारनं या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे.
First published:
top videos
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.