नरेंद्र मते/ वर्धा, 15 मार्च : इमारत बांधणीत (Construction) ४० टक्के खर्च स्टील व सिमेंटवर होतो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून स्टील, सिमेंट व इतर बांधकाम साहित्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही वर्षांच्या तुलनेत आता हे दर गगनाला भिडले असून परिणामी, घरांच्या किमतीत वाढ होऊ शकते.
त्यामुळं सामान्य नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल की नाही असा प्रश्न भेडसावू लागला आहे. आकडेवारीनुसार, यासंबंधी तपशीलवार माहिती द्यावयाची झाल्यास बांधकाम साहित्यापैकी महत्वाचा घटक असणाऱ्या स्टीलचा दर वर्ष भरापूर्वी (प्रती टन) ४२,००० रु. होता. हा आता जवळपास ८४,९०० रु. इतका झाला आहे. सिमेंटचा (प्रती बॅग) दर २६०रू. इतका खर्च यायचा तो आता ४०० च्या घरात गेला आहे. ४ इंच विटांचा दर प्रती हजार मागे ४,००० रू. इतका होता, तो आता ६,००० रु झाला आहे. बांधकाम साहित्याबरोबरच इलेक्ट्रिक वायर, फिटिंग्स, टाईल्स, पाईप, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, रेती, गौण खनिज, मुरूम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मजुरी यात देखील साधारणतः ४० टक्के वाढ झाली आहे.
हे ही वाचा-झळा, काहिली, उष्णतेची लाट! मुंबईसह महाराष्ट्रात पुढचा आठवडाही असाच असणार का?
मंदीसदृश्य अवस्थेत असलेल्या बांधकाम क्षेत्रास करोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनचा देखील चांगलाच फटका बसला असून त्यातच भरीस भर म्हणजे रशिया, युक्रेनच्या युद्धाचाही अप्रत्यक्ष परिणाम बांधकाम क्षेत्रावर होऊ लागला आहे. बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली ही वाढ नैसर्गिक आहे की, साठेबाजीमुळे किंवा नफेखोरीमुळे होत आहे, याची देखील प्रशासनाने व सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सामान्य गृह खरेदीदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील आता केली जात आहे. तसेच बांधकाम साहित्याचे दर असेच सातत्याने वाढत राहिल्यास नजीकच्या काळात घरांच्या किंमतीत किमान ४५० रू. ते ५०० रुपयापर्यंतची वाढ होणे अटळ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.