हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, प्रतिनिधी
चंद्रपूर, 18 एप्रिल: कोरोनाचा (Corona) विळखा आणखीनच घट्ट होताना दिसत आहे. राज्यातील विविध भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. चंद्रपूरचे (Chandrapur) नायब तहसीलदार अशोक सलामे (Deputy Tehsildar Ashok Salame) यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे.
50 वर्षीय अशोक सलामे हे नायब तहसीलदार पदावर कार्यरत होते. ते वरोरा येथील निवडणूक विभागात कार्यरत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक सलामे यांना ताप आल्यावर काही काळ त्यांनी घरीच गोळ्या घेत उपचार सुरू ठेवले होते. मात्र, प्रकृती बिघडल्यावर त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशोक सलामे हे व्हेंटिलेटरवर होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचा आज मृत्यू झाला.
वाचा: 50 वर्षांवरील नागरिकांना घरी उपचार घेण्यास मनाई, नवी मुंबई पालिकेचा निर्णय
चंद्रपुरातील कोरोनाची स्थिती काय?
चंद्रपुरात आज (18 एप्रिल 2021) 1584 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 25 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज 547 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 30,650 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 42,231 इतकी झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 10 हजार 981 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 3 लाख 29 हजार 846 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 80 हजार 149 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आज एकूण 1584 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 495, चंद्रपूर तालुका 67 बल्लारपूर 96, भद्रावती 124, ब्रह्मपुरी 240, नागभिड 27, सिंदेवाही 17, मूल 55, सावली 22, पोंभूर्णा 5, गोंडपिपरी 7, राजूरा 61, चिमूर 173, वरोरा 140, कोरपना 28, जीवती 5 आणि इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Coronavirus