Home /News /nagpur /

Nagpur : भाजप आमदाराला पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण, सहाव्या दिवशी आंदोलनात सहभागी

Nagpur : भाजप आमदाराला पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण, सहाव्या दिवशी आंदोलनात सहभागी

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक व्हावी यासाठी भाजपचे कोरोना पॉझिटिव्ह आमदार आज शंभर कार्यकर्त्यांसह नागपूरच्या लकगंज पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले.

नागपूर, 18 जानेवारी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप नेते आणि कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक व्हावी यासाठी भाजपचे कोरोना पॉझिटिव्ह आमदार आज शंभर कार्यकर्त्यांसह नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. या कोरोना पॉझिटिव्ह आमदारांचं कृष्णा खोपडे असं नाव आहे. खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. खोपडे यांनी भाजपच्या 100 कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी भाजपचे दुसरे आमदार प्रवीण दटके हे देखील उपस्थित होते. भाजप आमदार कृष्णा खोपडे हे 13 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवर माहिती दिली होती. विशेष म्हणजे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी आमदार खोपडे हे कार्यकर्त्यांसह आंदोलनात दिसले. नागपुरात एककीकडे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढताना दिसत असताना लोकप्रतिनिधींनीच अशाप्रकारे बेजबाबदार वागणं किती जनहिताचं आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान, खोपडे यांना कोरोना विषयी विचारलं तेव्हा त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ला घेऊनच आपण बाहेर पडल्याची प्रतिक्रिया दिली. (कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुंबईला आता म्युकरमायकोसिसचा धोका, पहिला रुग्ण सापडला) 'नाना पटोलेंना पागल खाण्यात भरती करा', आमदार कृष्णा खोपडेंची टीका या आंदोलनादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेले आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नाना पटोलेंवर सडकून टीका केली. "नाना पटोले यांना पागल खाण्यात भरती करण्याची आवश्यकता आहे", असा घणाघात त्यांनी यावेळी केला. "काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात सार्वजनिकरित्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारहाण किंवा शिविगाळ करु शकतो, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य देशभरात पोहोचलं आहे. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल काही बोललं तर त्याला मुंबईहून पोलीस पकडण्यासाठी नागपुरात आले. त्याचा सरकारी खर्च करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्याबद्दल ट्विट केलं तर थेट नागपूरला पोलीस आले. त्यापेक्षाही जास्त भयानक चूक नाना पटोले यांनी केली. त्यामुळे नाना पटोले यांना तातडीने अटक करा, अशी पोलिसांना विनंती आहे", असं खोपडे म्हणाले. (‘मॅरिटल रेप’ला भारतात गुन्हा का मानलं जात नाही? जाणून घ्या सविस्तर) "पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घ्यायला हवं. सामान्य कार्यकर्त्याला पोलीस कधीही उचलून घेऊन जातं. काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्षांवर कोणतीही दयावया दाखवण्याची गरज नाही. त्यांना पागल खाण्यात भरती करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे. पोलिसांनी कसूर दाखवल्यास आम्ही पोलिसांविरोधातही आदोलन करु", अशी भूमिका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मांडली.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या