Home /News /nagpur /

Nana Patole : नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मोदी सापडला, माध्यमांसमोर गावगुंड 'मोदी'ची बोबडी वळली?

Nana Patole : नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मोदी सापडला, माध्यमांसमोर गावगुंड 'मोदी'ची बोबडी वळली?

नागपूरमध्ये एका वकिलाने उमेश घरडे या व्यक्तीला प्रसारमाध्यमांसमोर सादर केलं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मोदीला उद्देशून शिवी दिली होती. तो हाच मोदी आहे, असा दावा त्यांनी केला.

नागपूर, 21 जानेवारी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भंडारा जिल्हा परिषद (Bhandara ZP Elections) आणि पंचायत समितीच्या प्रचारादरम्यान आयोजित कार्यक्रमात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 'मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो', असं वक्तव्य करताना नाना पटोले त्या व्हिडीओत दिसले होते. त्यांच्या या वक्तव्याचा देशभरात पडसाद पडला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड खळबळ उडाली होती. भाजप (BJP) नाना पटोले यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाली होती. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मारण्याची भाषा केली, असा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचा निषेध केला होता. भाजपच्या दिग्गजांनी या प्रकरणी नाना पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आपल्या वक्तव्याचा वाद चांगलाच उफाळल्याचं लक्षात आल्यानंतर नाना पटोले यांनी यूटर्न घेतला होता. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून नाही तर एका गावगुंड मोदीबद्दल तसं वक्तव्य केलं होतं, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी केलं होतं. विशेष म्हणजे याप्रकरणी पोलिसांचा आता तपास सुरु आहे. पण नाना पटोले यांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हा आज थेट प्रसारमाध्यमांसमोर दाखल झाला. तसेच नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच आहोत, असा दावा त्याने केला. 'नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मोदी मीच' नागपूरमध्ये एका वकिलाने उमेश घरडे या व्यक्तीला प्रसारमाध्यमांसमोर सादर केलं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मोदीला उद्देशून शिवी दिली होती. तो हाच मोदी आहे, असा दावा त्यांनी केला. स्वत: उमेश उघडे यांनी देखील सांगितले की, नाना पटोले यांनी जी शिवी दिली ती मलाच दिली. माझ्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मात्र मी घाबरलो होतो. त्यामुळे पुढे आलो नव्हतो, असं तो कथित मोदी म्हणाला. दरम्यान पत्रकारांनी त्या गावगुंड मोदीला प्रश्न विचारला असता त्याची बोबडी वळली. तो व्यस्थित उत्तर देऊ शकला नाही. नाना पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे प्रचाराला केव्हा आले होते? असा प्रश्न त्या मोदीला विचारण्यात आला. त्यावर मोदी काहीच उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहिला आहे. दरम्यान, भंडारा पोलिसांनी मोदी टोपण नाव असलेल्या या उमेश घरडे याला ताब्यात घेतलं आहे. तो लाखणी तालुक्यातील एका गावाचा रहिवासी आहे. तो नागपुरात एकटा राहतो. त्याला दारुचं व्यसनदेखील आहे. पण त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नाहीय. पोलिसांनी या कथित मोदीची चौकशी करुन वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवला आहे. (मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेना नगरसेवक आमनेसामने, प्रचंड बाचाबाची आणि घोषणाबाजी) 'तो मोदी नावाचा गावगुंड पोलिसांच्या ताब्यात', नाना पटोलेंचं स्पष्टीकरण दरम्यान, नाना पटोले यांच्याविरोधात भाजपने राज्यभरात आंदोलन करुन रान पेटवल्यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन मोदी नावाचा गुंड भंडारा पोलिसांच्या ताब्यात आला आहे, असा दावा केला होता. 'भंडारा पोलिसांनी कथित मोदीला पकडले आहे. लोकांचे बयान घेतले आहे, ज्यांनी तक्रार केली त्याचे ही बयान झाले आहे. भंडारा पोलिसांना मी सांगितले आहे की याचा तपास करा. तसा गावगुंड नसेल तर माझ्यावर कारवाई करा. हा गावगुंड कोण आहे, याचा भंडारा पोलीस तपास करत आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं होतं. "गुंड मोदीचे टोपण नाव मोदी आहे. त्याचं मूळ नाव आणि गाव भंडारा पोलिसांना विचारा, याच गावगुंडाने माझ्या विरोधात प्रचार केला होता. आता लोकांनीच मला ती माहिती दिली आहे, मी काही सभेत बोललो नाही, तर लोकांशी बोलत असताना मोदीला मारण्याबद्दल बोललो होतो", असंही पटोले यांनी सांगितलं होतं. तसंच, 'भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी, विषयाचा, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे. पंतप्रधानपद हे एका पक्षाचे नसते, ते देशाचे असतात. मात्र भाजप कोरोनाचे नियम तोडून आंदोलन करतंय. मी भाषणात बोलत नव्हतो. मी लोकांना हिंमत देण्यासाठी बोलत होतो. काँग्रेस पंतप्रधानपदाचा आदर करते", असंही पटोले म्हणाले होते. "भाजपची तालिबानी व्यवस्थेशी जुळली आहे. त्याचा प्रत्यय आता येत आहे. भाजपच्या आंदोलनाबाबत आपण निषेध करतोय. पंतप्रधानपदीचा मान घालवणाऱ्या या आंदोलना विरोधात काँग्रेसकडून पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे", असंही पटोले म्हणाले होते.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या