मुंबई, 18 डिसेंबर: झोमॅटोद्वारे (Zomato) खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स पोहोचवण्याचं काम करणाऱ्या एका तरुणाचा (Delivery Agent) शुक्रवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. मुंबईतली अंधेरी याठिकाणी ही घटना घडली. सतिश असं या डिलिव्हरी एजंटचं नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा होता. अतिवेगाने जात असलेल्या एका मर्सिडीज कारने सतीशच्या स्कुटरला धडक दिली आणि ती धडक एवढी जबरदस्त होती, की सतिशचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस (Oshiwara Police) तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. मर्सिडीजचा चालक 19 वर्षांचा होता. त्याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी केली जात आहे. अपघातात स्कूटी आणि मर्सिडीज कार या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात अंधेरीच्या (Andheri) लोखंडवाला परिसरात झाला आहे. सतिश पारसनाथ गुप्ता (Satish Parasnath Gupta) असं मृत युवकाचं संपूर्ण नाव आहे. झोमॅटोचे काही अधिकारी देखील याठिकाणी पोहोचले होते, पोलीस ठाण्यातही ही टीम दाखल झाली होती.
दरम्यान, यामध्ये हाय-प्रोफाइल व्यक्तीचा समावेश असल्याने पोलिसांकडून या प्रकरणी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सतिशच्या कुटुंबीयांनी केला आहे. सतीशच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीज (Mercedes) अति वेगाने जात होती. चालकाचा ताबा सुटल्याने ती डिव्हायडरवरून उडाली आणि सतीशच्या गाडीला धडकली. 'आमच्या कुटुंबाने हाताशी आलेला तरुण मुलगा गमावला आहे. या अपघातासाठी दोषी असलेल्यांवर कडक कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार मर्सिडीजचा चालक हा दारू पिऊन (Drunk Driving) गाडी चालवत होता.
सतिशच्या आणखी एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास झाला. अपघात झाला त्या वेळी सतिश मुंबईतील एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी जात होता.