'प्रेमात पडलेली अल्पवयीन मुलंही सुरक्षित भविष्य मिळण्यासाठी पात्र आहेत', POCSO न्यायालयाकडून आरोपी तरुणाला जामीन मंजूर
'प्रेमात पडलेली अल्पवयीन मुलंही सुरक्षित भविष्य मिळण्यासाठी पात्र आहेत', POCSO न्यायालयाकडून आरोपी तरुणाला जामीन मंजूर
मुंबई उच्च न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलं होतं की, लैंगिक इच्छा व्यक्तीपरत्वे भिन्न असतात. हल्लीची मुले लैंगिकतेशी संबंधित समस्यांबाबत अधिक जागरूक आहेत. त्यांच्याकडे लैंगिक संबंधांबद्दल जाणून घेण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. केवळ अल्पवयात ती अशा संबंधांत आल्याच्या कारणानं त्यांचं भविष्य खराब करणं योग्य नाही.
मुंबई, 20 मार्च : अल्पवयीन मुला-मुलींच्या प्रेमसंबंधांच्या संदर्भात POCSO न्यायालयानं एका 20 वर्षीय तरुणाला जामीन देताना महत्त्वाचं विधान केलं आहे. हा तरुण एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधांमध्ये होता आणि हे दोघे घरातून पळून गेले होते. संबंधित 16 वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी या तरुणावर अपहरण आणि बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर हा तरुण 30 दिवस कोठडीत होता आणि यानंतर त्याला जामीन मिळाला.
अशा प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं एका आदेशात किशोरवयीन मुलांमधील लैंगिक परिपक्वता आणि अशा प्रकरणांमध्ये विचारात घेण्याच्या घटकांवर भाष्य केलं होतं. याच बाबी विचारात घेत POCSO न्यायालयानं या तरुणाला 30 दिवसांनंतर जामीन दिला. या तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. केवळ या तरुणाचे प्रेमसंबंध कायदेसंमत नसल्याच्या कारणावरून त्याला अट्टल गुन्हेगारांसोबत तुरुंगात ठेवणं योग्य नाही. कारण, या प्रकरणाच्या पुढे जाऊन या तरुणासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. या तरुणाला तुरुंगात ठेवून त्याचं भविष्य खराब करणं योग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं.
अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलं होतं की, लैंगिक इच्छा व्यक्तीपरत्वे भिन्न असतात. पौगंडावस्थेतील लैंगिक वर्तन पद्धतींसाठी कोणतेही गणितीय सूत्र असू शकत नाही. कारण, जैविकदृष्ट्या मुलं-मुली यौवनात पोहोचल्यावर त्यांना त्यांच्या लैंगिक गरजा समजू लागतात. आजकालची मुले लैंगिकतेशी संबंधित समस्यांबाबत अधिक जागरूक आहेत. आजच्या काळात, त्यांच्याकडे लैंगिक संबंधांबद्दल जाणून घेण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे.
हे वाचा - पीडितेनं कपडे घातले असले तरीही जबरदस्तीनं शारीरिक संबंधांचा प्रयत्न हा बलात्कारच : High court चा मोठा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात काय म्हटलं होतं?
मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होतं की, “त्या वयात (यौवनाचं वय) असल्यानं मुली आणि मुलं दोघेही उत्तेजित होऊ शकतात आणि त्यांचं शरीर अशा संबंधात येऊ शकतं (लहान वयातील लैंगिक संबंध). जेव्हा एखादा मुलगा आणि अल्पवयीन मुलगी प्रेमात असतात आणि त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा अशा प्रकरणांवर निर्णय घेताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो, असं उच्च न्यायालयानं म्हटलं.
मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात नमूद केलेल्या घटकांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींचं वय, त्या मुलानं कोणतंही हिंसक कृत्य केलं आहे का किंवा तो अशा घटनेची पुनरावृत्ती करण्यास सक्षम आहे का, याचा समावेश आहे. तो मुलीला किंवा तिच्या कुटुंबीयांना धमकावू शकतो का? मुलगा सुटला तर या खटल्यातील साक्षीदार व पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे का? यांचा समावेश होता.
हे वाचा - आई-वडील जिवंत असेपर्यंत मुलगा संपत्तीवर दावा करू शकत नाही, न्यायालयानं फटकारलं
पोक्सो न्यायालयासमोर झालेल्या खटल्यात मुलीच्या बाजूनं मुलाच्या जामीन अर्जाला या कारणावरुन विरोध केला होता की, त्यांची मुलगी घरातून निघून गेली होती आणि त्याच्याशी लग्न करू इच्छित असतानाही तिला तिच्या पालकांची संमती नव्हती. कारण मुलगी अल्पवयीन होती. 14 फेब्रुवारी रोजी मुलीनं तिच्या आईला फोन करून आपण कायमचं निघून जात असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी तिची आई पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली. तेव्हा संबंधित तरुणी आणि तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.