Home /News /mumbai /

'देशाचं नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता', संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

'देशाचं नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता', संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

'फक्त सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले.'

    मुंबई, 27 जुलै : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सकाळपासून राजकीय शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना भावूक झाले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून 'ये दोस्ती...हम नही तोडेंगे... आपण आमच्या आयुष्यात खास आहात' असं म्हणत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याचबरोबर  'देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे' असं उद्गगारही राऊत यांनी काढले आहे. देशाचे नेतृत्व करण्याचे वक्तव्य केल्यामुळे राजकीय नेत्यांनी भुवय्या उंचावल्या आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल पंतप्रधानपदाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात आता राऊतांनी शुभेच्छा देताना हे विधान केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधूनही उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली  आहे. 'फक्त सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले. गंभीर विषयाचा, शत्रूचा अभ्यास करायचा व मगच घाव घालायचा या पक्क्या तयारीनेच ते मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले सर्व राजकीय विषाणू उडून धुळीतून वाहत गेले. उद्धव ठाकरे यांना कुटुंबाची महान परंपरा लाभली आहे. त्या परंपरेचा वारसा हा राजकीय तितकाच प्रबोधनाचा आहे, सामाजिक परिवर्तनाचा आहे. सह्याद्रीच्या टोकदार अभेद्य कडय़ाप्रमाणे त्यांचे नेतृत्व आज देशाचे शक्तिस्थान ठरले आहे. सह्याद्रीच्या कडय़ाने आता हिमालयाचे नेतृत्व करण्यासाठी पुढची चाल करावी. ‘साठी’ ही सुरुवात आहे, मोठ्या राजकारणाचा आरंभ आहे. महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. ' असं या लेखात म्हटलं आहे. 'उद्धव ठाकरे यांनी राजकारणात तडफदार युवानेते म्हणून प्रवेश केला व आज ‘साठी’ होत असताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम सुरू केले. याचा अर्थ असा की, ठाकरे यांना राजकारणात प्रवेश केल्यावर सतत संघर्ष करावा लागला, चढ-उतार पाहावे लागले, अपमान आणि टीका सहन करावी लागली. ‘सामना’तील मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणतात ते खरेच आहे. ते सांगतात, ‘‘मला वाटतं, जगात माझंच असं एकमेव उदाहरण असेल की, ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली, तोच पक्षाचा सर्वोच्च नेता झाला आणि याची कुवत नाही, याला काही कळत नाही असं अनेक जण बोलायचे, पण तोच राज्याचा मुख्यमंत्री झाला!’’ उद्धव ठाकरे यांनी गेल्या सहा महिन्यांत राज्याची धुरा उत्तम प्रकारे सांभाळली आहे' असंही म्हणत विरोधकांना टोलाही लगावला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Shivsena, उद्धव ठाकरे, संजय राऊत

    पुढील बातम्या