मनोज कुळकर्णी, मुंबई 06 ऑक्टोंबर : मुंबईतल्या गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी एका व्यक्तिचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला. पिरबीचंद आझाद(वय 82) असं त्या व्यक्तिचं नाव असून तो भीक मागून आपलं पोट भरत होता अशी माहिती पोलिसांनी दिलीय. त्याच्या घरात जाऊन पोलिसांनी जेव्हा पाहणी केली तेव्हा पोलिसांनाही त्या भिकाऱ्याची श्रीमंती पाहून आश्चर्याचा धक्का बसला त्या भिकाऱ्याकडे सगळे मिळून 10 लाखांच्या जवळपास रक्कम होती. मुंबईत भिकाऱ्यांच्या अनेक टोळ्या असून त्यांचं एक वेगळच जग असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. शुक्रवारी रात्री हार्बर रेल्वे मार्गावर गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता.
ती व्यक्ती गोवंडी रेल्वे स्थानकावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारी असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्याच्या घराचा शोध घेतला असता हार्बर मार्गावरील गोवंडी रेल्वे स्थानकाजवळच रेल्वे नाल्याच्या शेजारी एका झोपडीत राहत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्याच्या घरी पोलीस गेले असता घरी कोणीच नव्हते त्याच्या घराची तपासणी पोलिसांनी केली असता त्यांना मोठं घबाड सापडलं.
त्याच्या झोपडीत चिल्लर पैसे आणि नोटांनी भरलेल्या काही गोणी पोलिसांना आढळल्या. यात लाखोंची चिल्लर तसच बँकेतील लाखोंच्या ठेवीची कागदपत्रे आढळून आली आहेत. चिल्लरची रक्कम 1 लाख 50 हजार पेक्षा अधिक असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. तर ठेवीची रक्कम देखील 8 लाख 77 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
पिरबीचंदचा रेल्वे रूळ ओलांडताना शुक्रवारी रात्री अपघात झाला होता त्याला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात देण्याच्या उद्देशाने त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा