मुंबई, 02 डिसेंबर : मुंबईचा चेहरा असलेल्या फिल्मसिटीचा (mumbai film city) उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) हलवण्याची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath mumbai visit) हे फिल्मसिटीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण पेटले आहे. मनसेनं या वादात उडी घेत थेट भाजपच्या कार्यालयाबाहेर होर्डिंग झळकावले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बाँलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचे आहे. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यामातून उत्तर दिले आहे.
मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा "ठग" म्हटले आहे.
'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली.., कुठे महाराष्ट्राचं वैभव...तर कुठे युपीचं दारिद्र. भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं.' 'अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला "ठग" असे मजकूर असलेले होर्डिंग योगी आदित्यनाथ थांबलेल्या हॉटेलच्या परिसरात लावले आहे.
फिल्मसिटीचा वाद पेटला, ठग असा उल्लेख करत मनसेनं योगी आदित्यनाथ थांबलेल्या हॉटेलबाहेर लावले होर्डिंग... pic.twitter.com/2QTIKxo9xd
— News18Lokmat (@News18lokmat) December 2, 2020
'मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं' असल्याचा टोलाही या होर्डिंगच्या माध्यमातून मनसेनं लगावला आहे. हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावण्यात आले आहे. त्यामुळे या होर्डिंगवरून नवा वाद पेटण्याची चिन्ह आहे.