डोंबिवली, 24 जानेवारी: तुम्हाला भूतबाधा झाल्याचं सांगून एका महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना तब्बल 32 लाखांना लुबाडल्याची (32 lakh looted) धक्कादायक घटना डोंबिवलीत (Dombivli) उघडकीस आली आहे. आरोपी भोंदूबाबाने पीडित कुटुंबाला विविध प्रकारची भीती दाखवून, त्यांच्याकडून 32 लाख उकळले आहेत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेनं डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पवन पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपी भोंदूबाबाचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील रहिवासी आहे. तर प्रियांका योगेश राणे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. आरोपी पवन पाटील आणि फिर्यादी प्रियांका राणे यांची अलीकडेचं ओळख झाली होती. यावेळी आरोपी पाटील याने 'तुम्हाला भूतबाधा झाली असून तुमच्या कुटुंबावर कसलंतरी संकट आहे' अशी बतावणी केली. तसेच हे संकट आपण जादूटोणा आणि तंत्रमंत्राच्या सहाय्याने दूर करू शकतो, असं सांगितलं.
हेही वाचा-भयंकर! अनैतिक संबंधाचा झाला रक्तरंजित शेवट, हिंगोलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या
तसेच पीडित कुटुंबीयांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपी भोंदूबाबा हातचलाखी करत खडीसाखर, कुंकू आणि देवाची चांदीची प्रतीमा हवेतून काढून दाखवत होता. हा प्रकार पाहून राणे कुटुंबीय प्रभावित झाले होते. यानंतर आरोपीनं कुटुंबावर झालेली भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली पीडित महिलेसह तिची आई आणि भावाकडून बँकेतून मोठी रक्कम आपल्या बँक खात्यात टप्प्याटप्याने पाठवायला लावली. एवढंच नव्हे तर आरोपीनं राणे कुटुंबीयांच्या 1 लाख 9 हजार रुपये किमतीच्या महागड्या वस्तू देखील लाटल्या आहेत.
हेही वाचा-मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; नवजात बाळाला मृतदेहाशेजारी ठेवून कुटुंबीय फरार!
विविध प्रकारची भीती दाखवून भोंदूबाबाने राणे कुटुंबीयांकडून आतापर्यंत तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपये लुबाडले आहेत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं रामनगर पोलीस ठाण्यात भोंदूबाबाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.