मुंबई, 22 नोव्हेंबर : लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात एका महिला प्रवाशावर 3 जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
19 नोव्हेंबरला पीडित महिला एकटीच उत्तर प्रदेशातील कानपूर इथून रेल्वेने मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली होती. स्टेशन बाहेर आल्यावर कोणीही ओळखीचं नव्हतं. तिथे असलेल्या 3 नराधमांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांनी जाऊन विचारपूस केली आणि प्यायला पाणी आणि खायला वडापाव दिला. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचं महिलेनं सांगितलं.
19 आणि 20 तारखेच्या रात्रीच्या या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. 21 तारखेला म्हणजे गुरुवारी दिवसभर ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. याबाबत त्या परिसरातील राहणाऱ्या व्यक्तीने पोलिसाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
नेहरूनगर पोलीस घटनास्थळी आले त्यांनी या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात भरती केले. त्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि या प्रकरणातील एक आरोपीला अटक करण्यात आली.
त्यानंतर ही घटना टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली म्हणून ती त्यांच्याकडे हस्तांतरीत केली. टिळकनगर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत यातील आणखी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे.
==============