मुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

मुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, उद्धव ठाकरेंनी नेतृत्त्व करावं यावर आमची सहमती झाली आहे, असं स्पष्ट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकासआघाडी सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, उद्धव ठाकरेंनी नेतृत्त्व करावं यावर आमची सहमती झाली आहे, असं स्पष्ट केलं आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी यावर अजून होकार कळवलेला नाही.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची महत्त्वाची आणि निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान, शरद पवार बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत बाहेर पडले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही असं ठरवलं आहे की एकही गोष्ट अनुत्तरीत ठेवायची नाही. प्रत्येक मुद्यांवर एकमत झालं आहे. थोडे फार बारकावे आहे, त्यावर चर्चा सुरू आहे. मला अजून अर्धवट माहिती द्यायची नाही, एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू' अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

त्याआधी, 'उद्धव ठाकरे यांनी राज्याचं नेतृत्त्व करावी, यावर आमचं एकमत झालं आहे. या निर्णयावर तिन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबद्दल निर्णय जाहीर केला जाईल', अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसंच सर्व काही ठराव हा लिखित स्वरूपात केला जात आहे, असंही पवारांनी सांगितलं.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरूच होती. काही वेळानंतर पत्रकार परिषद संपली आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी माहिती दिली. अजून चर्चा संपली नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. चर्चा सकारात्मक झाल्याचं ते म्हणाले. पण अजून काही मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्याही चर्चा सुरू राहणार आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या दृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची पहिली औपचारिक बैठक मुंबईत नेहरू सेंटरला झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीतून सत्तास्थापनेचा अंतिम तोडगा निघणार की अजून वाट पाहावी लागणार हे उद्या स्पष्ट होईल. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार, असं सांगितलं जात आहे.

या बैठकीसाठी ठाकरे, पवार, पटेल, खर्गे यांच्यासह राष्ट्रवादीचे अजित पवार, नवाब मलिक, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य आणि मिलिंद नार्वेकरसुद्धा नेहरू सेंटरमध्ये होते. याशिवाय खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हेदेखील आधीच या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होते.

=====================================

Published by: sachin Salve
First published: November 22, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading