मुंबई, 18 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आज दुपारी महत्त्वाची बैठक बोलावली असून यावेळी लॉकडाउनचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संकटातून सावरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्यात ज्या भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे अशा काही ठिकाणी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई, पुणे, अमरावती आणि कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अमरावतीमध्ये परिस्थितीही चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोणतेही विलंब न करता तातडीने उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
'गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा', असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
'राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Covid19, Lockdown, Mumbai