विशाल पाटील, प्रतिनिधीमुंबई, 26 जून : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) संकट कोसळले आहे. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पण, राज ठाकरे यांनी या घडामोडींवर वेट अँण्ड वॉच भूमिका घेतली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून ते घरी आहे. सोमवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन करून प्रकृतीची विचारणा केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गट मनसेमध्ये सामील होणार अशी चर्चा रंगली होती. पण, राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यात राजकीय भूकंप आलेला असताना वरिष्ठांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मौन पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्य राज ठाकरे कोणाला भेटत नसले तरी फोनवर ऍक्टिव्ह झाले आहे. शिंदे बंडखोर गट मनसेमध्ये विलीन होणार अशी चर्च रंगली आहे. पण यावर राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.
शिंदे आणि राज ठाकरे यांच्या फोननंतर मनसे नेत्यांनी मौन बाळगलं आहे. या संपूर्ण घडामोडींवर मनसेनं तुर्तास वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
शिंदे गटाकडे काय आहे पर्याय?
एकनाथ शिंदे यांना जवळपास 38 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळू शकतं. शिंदे गटाकडून आपण शिवसेनेतच असल्याचा दावा केला जातोय. शिंदे गटाकडून आपल्याकडे एक तृतीयांश आमदारांची संख्या असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आपला पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचाच पक्ष आहे, असं सांगितलं जात आहे. पण शिवसेनेकडून शिंदे गटाविरोधात कायदेशीर लढाई लढली गेली आणि त्यांचा पराभव झाला तर शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटाच्या आमदारांना भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं आहे. शिंदे या दोन्ही पक्षात विलीन झाले नाहीत आणि त्यांना विलीन होण्याची वेळ आली तर त्यांच्यासमोर मनसेचा देखील एक पर्याय खुला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची जवळीक वाढल्याचं देखील चित्र आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये तशा घडामोडी घडल्या तर आगामी काळातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये अभूतपूर्व असा बदला झालेला दिसण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.