शिवसेनेत जाणार का? उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खडसेंनी केला खुलासा

शिवसेनेत जाणार का? उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खडसेंनी केला खुलासा

एकनाथ खडसे यांनी आज विधान भवनात जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे खडसे हे शिवसेनेत दाखल होणार अशी राजकीय चर्चा रंगली होती, यावर खुद्द एकनाथ खडसे यांनी पडदा टाकला आहे.

एकनाथ खडसे यांनी आज विधान भवनात जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 15-20 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हजर होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जी मागणी केली होती, तीच मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली, असं सूचक वक्तव्य खडसे यांनी केलं.

तसंच आपण शिवसेनेत यावं अशी उद्धव ठाकरेंची इच्छा असणे साहजिक आहे. परंतु, कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याबद्दल आपला कोणताही निर्णय झाला नाही, असा खुलासाही खडसे यांनी केला.

'मी भाजपमध्ये नाराज नाही'

भाजपमध्ये मी नाराज नाही. मी नाराज असल्यामुळे सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे माझ्या भेटीला आले नाही. या नेत्यांची वारंवार भेट होत असते. या भेटीत आमचं सरकार का आलं नाही, अशी चर्चा झाली, असंही खडसे म्हणाले.

'गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला निधी'

तसंच गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दरवर्षी या मेळाव्याला आम्ही हजर असतो. आताही आम्ही सर्व नेते हजर राहणार आहोत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादमध्ये स्थापन करण्याचा निर्णय आधीच्या सरकारकडे केला होता. परंतु, याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं असून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहितीही खडसेंनी दिली.

एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

दरम्यान, भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांची नाराजी वाढताना दिसत आहे. यामध्ये फक्त एकनाथ खडसे यांचाच नाही तर पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. विधानसभेतील पराभवानंतर आता पंकजा मुंडे पक्षातून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेले होते. रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी एकनाथ खडसे-पंकजा मुंडे यांची भेट झाली.

भाजपमध्ये का वाढत आहे धूसफूस?

विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. भाजपचा संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत राहिला. त्यातच मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेसोबत वाद झाल्याने भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. सत्ता गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे हे नाराज नेते खरंच भाजप सोडणार का, हे पाहावं लागेल.

First published: December 10, 2019, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading