Home /News /mumbai /

मुख्यमंत्र्यांनी का दिला फ्लोर टेस्टआधीच राजीनामा? 'हे' आहेत कारणं

मुख्यमंत्र्यांनी का दिला फ्लोर टेस्टआधीच राजीनामा? 'हे' आहेत कारणं

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.

    मुंबई, 29 जून : मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ होता. कारण राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार महाविकास आघाडीला गुरुवारी विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याची संधी होती. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी फ्लोर टेस्टआधी राजीनामा का दिला? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताना केलेल्या भाषणात आपलीच माणसं आपल्याविरोधात मत देताना बघायचं नाहीय, असं सांगितलं आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांनी फ्लोर टेस्टआधी राजीनामा देण्यामागे काही महत्त्वाचे कारणे आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आज ज्या घटना घडल्या अगदी तशा काही घटना 1996 मध्ये देशात वाजपेयी सरकार असताना घडल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी यांनी 1996 मध्ये सभागृहात विश्वासदर्शक ठरावावर भाषण केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विरोधकांनी एनडीएविरोधात लोकसभेच अविश्वासाचा ठराव मांडला होता. त्यानंतर अवघ्या एका मतासाठी वाजपेयी सरकार कोसळलं होतं. त्यावेळी वाजपेयी यांच्यावर सभागृहात विरोधकांनी टीका केली होती. अनेक प्रश्न उपस्थित केले होते. वाजपेयी यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरेदेखील दिली होती. सभागृहात काय-काय घडलं होतं त्याबाबतच्या चर्चा आजही रंगतात. (फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला! 'या' तारखेला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ) वाजपेयी यांचं सरकार कोसळलं तेव्हा सभागृहात ज्या काही घडामोडी घडल्या होत्या अगदी तशाच घडामोडी महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्या कदाचित फ्लोर टेस्टला झाल्या असत्या. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा नाही हे निश्चितच आहे. त्यांना महाविकास आघाडीच्या विरोधातच मतदान केलं असतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचं आणखी जाहिररीत्या उघड झालं असतं. या दरम्यान भर सभागृहात भाजपकडून खिल्ली उडवली गेली असती किंवा जल्लोष साजरा केला गेला असता. या सभागृहात बहुमत सिद्ध न झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना कदाचित भाषण करुन राजीनामा देखील द्यावा लागला असता. या सगळ्या घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतं. विशेष म्हणजे भाजप नेते समोर असताना मुख्यमंत्र्यांना आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर करावं लागलं असतं, या सगळ्या घडामोडींचा विचार करता मुख्यमंत्र्यांनी आधीच राजीनामा दिल्याचं मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा चेंडू हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात येवून पडला आहे. शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांच्या जोरावर फडणवीस नवीन सरकार स्थापन करु शकतात. अर्थात तसं होण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांचं मन पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या दिशेला वळले तर फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं. पण त्याची शक्यता कमी आहे. कारण बंडखोरांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे आता भरपूर वेळ आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना वळवण्यासाठी त्यांच्याकडे आता वेळच वेळ आहे. त्यांना आता बंडखोरांना वळवण्यासाठी कोणतीही डेडलाईन शिल्लक राहिलेली नाही. याउलट आता फडणवीसांचं आव्हान वाढलं आहे. उद्धव ठाकरेंच्या भावनिक सादला बंडखोर आमदारांनी बळी पडू नये यासाठी लवकर सरकार स्थापन करणं हेच फडणवसांसाठी महत्त्वाचं असू शकतं.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या