मुंबई, 08 नोव्हेंबर : राज्यात (Maharashtra) अनलॉकची (Unlock) घोषणा करत सर्वच उद्योग-धंदे नियम आणि अटींसह सुरू करण्यात आले आहे. पण, राज्यातील मंदिरं (temple open issues) उघडण्यास अजूनही महाविकास आघाडी सरकारने परवानगी दिली नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांनी मंदिर का उघडली जाणार नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
'मंदिर कधी उघडणार असं विचारलं जात आहे. दिवाळीनंतर एक नियामवली केली जाणार आहे. गर्दी टाळणे हाच एक नियम असणार आहे. मंदिरांमध्ये घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिक जात असतात. त्यांना आतापर्यंत आपण जपत आलो आहोत. परंतु, कोरोनाच्या या काळात ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडूच नये. मंदिर, मशीद, चर्चमध्ये आपण खेटून खेटून आरती, प्रार्थना करत असतो. त्यामुळे जर मंदिरात एखादा कोरोनाबाधित व्यक्ती आला तर कोरोनाची लागण झाली तर ते जास्त महागात पडले. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
'तुमचं तुम्ही बघा म्हणून हात झटकतील'
'माझ्यावर टीका होत आहे, पण मी पहिल्याच दिवशी सांगितले आहे. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला कुणासोबत वाईटपणा घेण्याची वेळ आली तर ती मी घेण्यासाठी तयार आहे. वाईट म्हणणारी चार दिवस बोलत असतात. पण उद्या काही निर्णय घेतला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले, तर तेव्हा टीका करणारे कुणीही जबाबदारी घेण्यासाठी पुढे येणार नाही. उलट ती लोकं तुमचं तुम्ही बघा, आम्ही तर बोललोच होतो, असं सांगून मोकळी होतील. म्हणून सावधपणे पाऊलं टाकत आहोत, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.
मेट्रो कारशेडवरून भाजपला टोला
'मेट्रो कारशेड प्रकल्प हा कांजुरमार्गला हलवण्यात आला आहे. त्याच्यावरून टीका झाली. कुणी तरी म्हणाले की ही जागा मिठागराची आहे. पण, टीका करणाऱ्यांनी मुंबई करांच्या प्रकल्पात मिठाचा खडा टाकला आहे. आता मिठाचा जो खडा टाकला त्याचा इलाज केला जाईल. आम्ही काही डोळेबंद करून काही काम करत नाही. जे जे मुंबईकरांसाठी हिताचे काम आहे, ते टीका करण्याऱ्यांची पर्वा न करता केले जाईलच, असंही त्यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्रात फटाके बंदी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
'गेल्या सात महिन्यांपासून लढा देऊन परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांच्या धुरात हे वाहून जाता कामा नये, प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळा, शक्यतो फटाके फोडूच नये. फटाके फोडले नाही तर उत्तमच आहे. दिवाळीतील चार महिने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फटाकेवर बंदी आणली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेऊन फटाके फोडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.