मुंबई, 20 एप्रिल: भाजपने उमेदवारी दिलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे. ज्या पोलीसांनी मुंबईकरांचे संरक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली, जे पोलीस अहोरात्र मुंबईकरांचे रक्षण करतात त्यांच्याबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य करुन भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे. मुंबईचे अवमान करणाऱ्या या सर्व प्रकरणाबाबत शिवसेना सत्तेसाठी शांत बसली आहे का? असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे महाआघडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी उपस्थित केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सध्या जामिनावर असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपतर्फे भोपाळ येथून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही क्षणांतच त्यांनी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडविली आहे. भोपाळ येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या एटीएसचे माजी संचालक हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले होते. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांना दहशतवाद्यांनी मारल्याने माझे सुतक संपले. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळे झाला, असे खळबळजनक विधान करुन प्रज्ञासिंह यांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांनी देखील आक्रमक पवित्रा धारण केला असून सदर विरोधात निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपचीदेखील गोची झाली असून शिवसेना देखील अडचणीत आली आहे.
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा मी स्पष्टपणे निषेध करतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद हेमंत करकरेंच्या नावावर राजकारण खेळणे म्हणजे मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे.
— Milind Deora (@milinddeora) April 20, 2019
हा 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक महाराष्ट्र पोलीस अधिकारी व शिपाही यांचा अपमान आहे. शिवसेना शांत का आहे? pic.twitter.com/mlDnWwvsvy
या प्रकरणी भाजपकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तर शिवसेनादेखील याप्रकरणी तोंडावर बोट ठेऊन गप्प असल्याने त्यांच्यावरही विरोधकांनी निशाणा साधला आहे. याप्रकरणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर हल्लाबोल चढविला आहे. याबद्दल बोलताना देवरा म्हणाले की, मुंबई पोलीस हे मुंबईकरांचा अभिमान आहे. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य मुंबईकर कधीही सहन करणार नाही. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेले वक्तव्याचा मी स्पष्टपणे निषेध करतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद हेमंत करकरेंच्या नावावर राजकारण खेळणे म्हणजे मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे. मुंबईवर केल्या गेलेल्या हया अपमानावर शिवसेना शांत का आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. यातून शिवसेनेचे मुंबईवरील प्रेम दिसून येत असल्याची टीका करताना याचे उत्तर मुंबईकर निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर या माध्यमातून भाजपाचाही खरा चेहरा समोर आला असून भाजपाने विकासाचे मुद्दे सोडून आता भावनिक मुद्यांवर राजकारण करण्यास सुरुवात केली असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
VIDEO : अखेर साध्वीच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...