शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणाऱ्या कंगनावरून भाजप गप्प का? शिवसेनेचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणणाऱ्या कंगनावरून भाजप गप्प का? शिवसेनेचा हल्लाबोल

अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय?

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर :  'हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय?' असा सवाल करत शिवसेनेनं पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतवर टीका करत भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शेती विधेयकावरून सुरू असलेल्या गदारोळावर भाष्य करण्यात आले आहे. कंगना राणावतने शेती विधेयकाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अतिरेकी असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यावरून सेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

'आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत. पाशवी बहुमत, जोरजबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे?' असा सवाल सेनेनं उपस्थितीत केला.

'शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल. ‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय?' असा थेट सवाल करत सेनेनं भाजपला फटकारले आहे.

'नव्या विधेयकाच्या दोन बाजू आहेत. सरकारने एपीएमसीमधील दलालशाही खतम केली व या मार्केटच्या बाहेरही शेतकऱ्यांला आपला माल विकता येईल, बाहेर माल विकला जाईल, तो विकत घेणारे नक्की कोण, हाच वादाचा विषय आहे. बडे उद्योगपती आता किराणा भुसार व्यवसायात गुंतवणूक करीत आहेत. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांच्या नव्या गुलामीत शेतकरी फसणार तर नाही ना?  अशी शंका सेनेनं उपस्थितीत केली.

'शेतकरीराजा दहशतवादी, मुंबई पाकिस्तान, महापालिका बाबराची फौज वगैरे वगैरे. बाकी सर्व सोडा हो! पण सत्ताधारी भाजप मंडळाने शेतकऱ्यांचा अवमान झाल्यावर तरी तोंडावरचे मास्क काढावे हीच एक अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील मराठी मुलीबाबत घाणेरड्या शब्दांत विधान केल्यावरही राष्ट्रीय महिला आयोगास जाग येऊ नये याचेच आश्चर्य वाटते', असा टोलाही सेनेनं आयोगाला लगावला.

'उत्तर प्रदेशात एका किरकोळ प्रकरणात ‘आप’चे खासदार संजय सिंग यांच्यावर योगी सरकारच्या पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. संजय सिंग यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या काळातील अन्याय व वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रश्न विचारले. कोरोनासंदर्भात झालेल्या अफरातफरीवर बोट ठेवले. त्यामुळे खासदारावर सरळ देशद्रोहाचा गुन्हाच दाखल व्हावा हे धक्कादायक आहे. न्यायासाठी आवाज उठविणारा शेतकरी आतंकवादी. भ्रष्टाचाराविरुद्ध प्रश्न विचारणारे खासदार देशद्रोही! राज्यांचे हक्क व अस्मितेसाठी लढणारे सगळेच देशाचे दुश्मन. मग आमच्या लोकशाहीप्रधान देशात राष्ट्रवादाची, राष्ट्रभक्तीची नवी व्याख्या बनवून कोणी हिंदुस्थानच्या घटना पुस्तकात चिकटवली असेल तर तसे लाल किल्ल्यावरून एकदाच जाहीर करावे', असं आव्हानच सेनेनं मोदींना केले.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading