मुंबई, 21 मार्च : मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे हा निलंबित होता. त्यावेळी त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी नेमकं सचिन वाझेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोण घेऊन गेलं? हे समोरं आलं पाहिजे, असा थेट सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे केली आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच सचिन वाझे आणि शिवसेनेचे संबंध यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
' सचिन वाझे हा 17 वर्ष निलंबित होता. निलंबित असताना सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खास होता. सचिन वाझे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं, हे समोर आलं पाहिजे' असा थेट सवाल सेनेला विचारला आहे.
'मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे कुणी ठेवायला सांगितली, एक पोलीस अधिकारी हे सगळं करतोय हे गंभीर आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून झाले हे समोर आलं पाहिजे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, राज्य सरकारकडून या प्रकरणाचा तपास होणार नाही. केंद्राने जर चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, या प्रकरणाचा नीट तपास केला तर कल्पनेपलीकडेच चेहरे समोर येतील, असंही राज ठाकरे म्हणाले.
खाद्यतेलाचा टँकर पलटी होताच तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, Video Viral
'पोलीस हे परस्पर हे काम करू शकत नाही. हे कुणाच्या सांगण्यावरून काम करण्यात आले आहे. स्फोटकांनी कार सापडल्यानंतर जे धमकी पत्र दिले आहे त्यामध्ये आदराने भाषा वापरण्यात आली आहे. गुजराती व्यक्तीने हे पत्र लिहिले असावे, असा अंदाज शब्दांवरुन येत आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना शहरातील बार-रेस्टारंटकडून पैसे वसूल करण्यास सांगणे हे अत्यंत घाणरेडे आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. केंद्र सरकारने या प्रकरणी सखोल चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. या प्रकरणाचा तपास योग्य झाला नाहीतर लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास बसणार नाही, असं मतही राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.