मंत्रालयातील 602 दालन कुणाकडे? ज्यांना मिळाले ते सापडले वादात?

मंत्रालयातील 602 दालन कुणाकडे? ज्यांना मिळाले ते सापडले वादात?

या दालनात सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्र्याला हे दालन दिलं जातं. पण हे दालन आजपर्यंत अनेक मंत्र्यांना अडचणीत आणणारे ठरले आहे

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. आज महाविकासआघाडील मंत्र्यांसाठी  मंत्रालयातील दालन वाटप केले आहे. आज दालन वाटप करताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जवळील सहाव्या मजलावरील दुसरे मोठे आणि महत्त्वाचे दालन कुणााला ही दिले नाही. हे दालन आहे 602.

मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 601 दालन देण्यात आलं आहे. त्यांच्या शेजारीच 602 हे सर्वात मोठं दालन आहे. या दालनात सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्र्याला हे दालन दिलं जातं. पण हे दालन आजपर्यंत अनेक मंत्र्यांना अडचणीत आणणारे ठरले आहे. 1999 साली  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना 602 हे दालन देण्यात आलं होतं. पण कालांतराने त्यांच्यावर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले.

त्यानंतर हेच दालन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले. अजितदादांनी याच दालनातून कारभार पाहिला. पण, सिंचन घोटाळ्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

2014 मध्ये आघाडी सरकारला खाली खेचून भाजप सरकार सत्तेत आलं. त्यावेळी 602 दालन हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मिळालं. एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल विभागासह अनेक खात्यांचा पदभार होता. परंतु, एमआयडीसी जमीन घोटाळ्यासह इतर आरोप झाले. त्यामुळे खडसे यांना पायउतार व्हावं लागलं होतं.

खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर 602 दालन हे भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांना देण्यात आलं होतं. फुंडकर हे तत्कालीन कृषी मंत्री होते. फुंडकर हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटातील नेते होते. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळातला सहभाग हा फारच कमी दिसला. कित्येक वेळा कृषी विभागाबद्दल माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखच घोषणा करत होते. दुर्दैवाने फुंडकर यांचं ह्रदयविकाराच्या धक्काने निधन झालं.  त्यांच्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी 602 दालन हे अनिल बोंडे यांना देण्यात आलं होतं. पण, विधानसभा निवडणुकीत अनिल बोंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. गमंत म्हणजे, 602 दालन हे मंत्रालयातील सर्वात मोठे दालन आहे. त्यामुळे या दालनात फडणवीस यांच्या काळात तीन विभाग करण्यात आले होते. यात अर्जुन खोतकर आणि सदाभाऊ खोत यांची दालनंही यात थाटण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर पराभूत झाले आणि फडणवीस सरकार नसल्यामुळे खोत यांनाही हे दालन सोडावे लागले आहे.

त्यामुळे 602 दालन हे ज्या मंत्र्यांना मिळाले त्यांच्या पदरी आरोप आणि अपयशच पदरी पडले. आता ठाकरे सरकारच्या कार्यकाळात हे दालन कुणाला मिळणार याकडे सर्वांचा लक्ष्य लागलं आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्रिपद हे अजित पवार यांना मिळणार अशी चर्चा आहे. जर अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले तर 602 दालन हे त्यांच्यासाठी रिकामे सोडण्यात आले असावे, अशी चर्चा रंगली आहे.

शासकीय निवासस्थानावरून काँग्रेस नेते नाराज

दरम्यान,  शिवसेना आणि  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना शासकीय निवास्थानांचं वाटप करण्यात आलंय. मात्र, कॉंग्रेसमधील शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप वेटींगवर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ४ मंत्री आणि १ विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय निवासस्थान वाटप केले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोबत शपथ घेतलेल्या कॉंग्रेसच्या  बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊतांना अजूनही घर देण्यात आलेलं नाही. खात्याच वाटप तर नाहीच पण शासकीय निवासस्थान वाटप झाले नसल्याने काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्यांनी दिली.

सेनेचे नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप केले गेले आहे पण थोरात राऊत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना मात्र, अद्याप ही शासकीय निवासस्थान दिले गेले नाही.

First published: December 3, 2019, 5:31 PM IST

ताज्या बातम्या