धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणारी ती गायिका कोण आहे?
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात एका तरुणीने बलात्कार केल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान मुंडेंवर असे गंभीर आरोप करणारी रेणू शर्मा नेमकी आहे तरी कोण?
मुंबई, 13 जानेवारी: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. असे असले तरीही या पोस्टनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती या पोस्टमधून समोर आली आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत. त्यांनी यामध्ये दिलेल्या माहितीनुसार रेणू शर्मा या करुणा शर्मा (Renu Sharma) यांच्या बहिण आहेत.
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान त्यांनी असेही म्हटले आहे पोलिसांनी त्यांची लेखी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. 10 जानेवारीला त्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. 11 जानेेवारीला मुंबई पोलिसांनी त्यांचा अर्ज स्विकारला. रेणू शर्मा यांनी त्यांच्या तक्रारीत असं म्हटलं आहे बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याबरोबर मुंडे यांनी संबंध ठेवले. 2006 पासून इच्छेविरुद्ध त्यांनी शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
रेणू शर्मा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये त्यांनी ओशिवारा पोलिसांवर लेखी तक्रार नोंदवून न घेत असल्याचा आरोप केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
कोण आहेत रेणू शर्मा?
महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदोरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला आहे. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंनी फेटाळले सर्व आरोप
या सगळ्या आरोपांवर स्वत: धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत.
'2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता,' असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमधून केली आहे.