'आपण कुठल्या कडेवर आहात', रोहित पवारांचा पडळकरांना सणसणीत टोला, म्हणाले...

'आपण कुठल्या कडेवर आहात', रोहित पवारांचा पडळकरांना सणसणीत टोला, म्हणाले...

'मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल'

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर :  'शरद पवार यांच्या खांद्यावरून खाली उतरा मग कळेल' अशा शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला रोहित पवार यांनी जशास तसे उत्तर देत 'आपण कुठल्या कडेवर आहात, आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल' असा सणसणीत टोला लगावला आहे.

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे आज सकाळी रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या  करमाळा महामार्गावरून जात होते. महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पडळकर यांनी एक व्हिडीओ तयार करून रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली होती.  रोहित पवार यांनीही याची पडळकरांच्या व्हिडीओची दखल घेऊन आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे.

'माझे मित्र गोपीचंद पडळकर यांनी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते. पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत' असा टोलाच रोहित पवारांनी पडळकरांना लगावला.

'मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका' असा सणसणीत टोलाही रोहित पवारांनी लगावला.

तसंच, 'राहिला प्रश्न  शरद पवार यांच्या खांद्यावर बसण्याचा, तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा' असा सल्लावजा टोलाही पडळकरांना हाणला.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

'देशात आणि महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांपासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार रोज हे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत असतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्या सारखी वाटते. पण त्यांना अजून माहिती नाही. शरद  पवारांच्या खांद्यावर बसून ते त्यांची उंची मोजतात. रोहित पवार तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात, हे तुम्हाला कळेल' अशी टीका पडळकर यांनी केली होती.

Published by: sachin Salve
First published: October 10, 2020, 2:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या