मुंबई, 30 सप्टेंबर : पावसामुळे मुंबईसह राज्यभरात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि खड्डेमय रस्ते (potholes on road) यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. याच मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी म्हटलं, गणपतीपूर्वी, पावसाळ्यात महापौरांनी रस्त्यांची पाहणी केली असती तर त्यांना मुंबईकरांची चिंता आहे असं झालं असतं. आता त्यांची भावना ही पळता भुईथोडी आहे. मुंबईकर नव्या आजाराने ग्रस्त आहेत ते म्हणजे खड्डे. 21 हजार कोटी रस्त्यावर खर्च केले. 48 कोटी रूपये खड्डांवर खर्च करणार आहेत ते वाढवू शकतात. पोर्टलवर 927 खड्डे आहेत महापौर म्हणतात 48000 खड्डे बुजवले. खड्डे बुजवल्याचं दाखवून कंत्राटदाराला मलिदा मिळवून देण्याचा प्रकार आहे.
मुख्यमंत्र्यांनी जर राज्यभरातील विविध एजन्सीच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील जे खड्डे आहेत त्या एजन्सीजची बैठक घेतली असती. त्या कंत्राटदारावर कारवाई केली असती तर आम्हीलाही विश्वास बसला असता. ज्या पद्धतीने खड्डे बुजवले जातात त्याची चौकशी लावली असती तर आम्ही त्यांच्या हेतूवर शंका घेतली नसती. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही गेल्या काळात सुप्रिया सुळेंनी खड्डे विथ सेल्फी आंदोलना सारखे आहे. हे दिखाऊ पणासारखे आहे. आता सुप्रिया सुळे कुठे गेल्या? असा सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला आहे.
गेल्या 24 वर्षात21हजार कोटी खड्ड्यात घातले..तरी मुंबईतील रस्त्यांचे "रस्ते" लागले.आता धावाते दौरे करुन..कारवाईचा आरडाओरड करुन..काय सांगयताय..?
“मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी!” तेच कंत्राटदार..त्याच निविदा..तिच थूकपट्टी.. कसं पटणार मुंबईकरांना..खड्ड्यांनी पितळ उघडं केलं! 2/2 — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 30, 2021
आशिष शेलारांना किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर
महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, गेल्या 25 वर्षातली आकडेवारी सांगतायत... गेली 24 वर्षे तुम्हीच आमच्यासोबत होते, तेव्हा तोंड का उघडलं नाही? आता असा कोणता माऊथवॉश घेतला की एवढी खळखळ करताय? आम्ही काम करतो, आरोपांचं खंडन करत बसत नाही. मुख्यमंत्री महाराष्ट्राचं संयमी नेतृत्व... मुख्यमंत्र्यांवर टिका केली तरी ते कामातून उत्तर देतात. महापौरांची पळता भुईथोडी म्हणतांना शेलार हे तरी मान्य करतात की, महापौर धावाधाव तरी करतात. शेलारांना बोलावंच लागेल, नाहीतर भातखळकर स्पर्धेला आहेतच.
मनसेनेही काढला चिमटा
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आंदोलनावरुन मनसेनेही निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळेंचा सेल्फी विथ खड्डे आंदोलनादरम्यानच एक फोटो संदीप देशपांडे यांनी ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करताना त्यांनी म्हटलं, ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का??
ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?? pic.twitter.com/nwkjr6dX0d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 30, 2021
कामचुकार कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याची सूचना देऊन मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविताना गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
संपूर्ण रस्त्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत, त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी कृती आराखडा तयार करावा, निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही आणि कामात गुणवत्तेवर भर दिला गेला नाही तर कामचुकार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, Mumbai, Supriya sule