मुंबई, 28 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena mp Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांनी ईडीने नोटीस बजावल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. संजय राऊत यांनी तर नोटीस मिळालीच नसल्याचा दावा केला आहे. पण, ही ईडीची नोटीस ही 55 लाखांच्या कर्जापोटी बजावण्यात आल्याचे समोर आले आहे.
PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं.
वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.
विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेबरला चौकशीसाठी बोलावले आहे.
दरम्यान, मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीसवर आपली प्रतिक्रिया दिली. 'ईडीने बजावलेली कोणतीही नोटीस मला अजून मिळालेली नाही. भाजपचे नेतेच ईडीच्या नोटिसीबद्दल बोलत आहे. त्यामुळे मी माझा माणूस हा ईडी कार्यालयात पाठवला आहे. कदाचित नोटीस ही कार्यालयात अडकली असेल. त्यांचा माणूस आता नोटीस घेऊन निघाला असेल' असं राऊत म्हणाले.
'हे राजकारण आहे. त्यांना काय राजकारण करायचे आहे, ते करू द्या. मी नोटीस शोधत आहे आहे. कदाचित भाजप कार्यालयातून निघाली असेल. पण या प्रकरणावर दुपारी शिवसेना भवनात सविस्तर बोलणार आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केले.