मुंबई 23 मार्च : कोरोनामुळे सध्या लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारने केलंय. जवळपास सगळ्याचं कार्यालयांना बंद करण्यात आलं आहे. ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी घरूनच काम करावं असा आदेशच देण्यात आलाय. आता तर मुंबई आणि पुणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे सगळेच सध्या घरी आहेत. सतत धावपळ करण्याची सवय असलेल्या लोकांना घरी राहुन करायचं काय? असा प्रश्न पडलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही सध्या घरीच आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही कायम व्यस्त असणारे पवार सध्या काय करतात असा प्रश्न विचारला जातोय. त्याचं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे.
पवार म्हणाले, पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करता आहात? मी सांगतो... घरी पुस्तक वाचत आहे.
शरद पवारांना वाचनाची प्रचंड आवड आहे. जगभरातली विविध विषयांची पुस्तकं त्यांच्या संग्रही आहेत. दररोजच्या कामाच्या व्यापातही त्यांचं वाचन सुरूच असतं. आता जरा निवांत वेळ आहे. आणि सर्व भेटीगाठीही बंद आहेत. त्यामुळे पवार हे मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आहेत. या काळात आपलं वाचन सुरू असल्याचं त्यांनीच जाहीर केलं. त्यासंदर्भातला एक फोटोही त्यांनी ट्वीट केलाय.
या फोटोत पवार हे ‘तुका म्हणे’ हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. कामा निमित्त पवार हे जगभर फिरत असतात. ज्या शहरात ते असतील त्या शहरातल्या पुस्तकातल्या उत्तम दुकांनांमध्ये ते आवर्जुन जात असतात. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, करंट अफेअर्स, आंतरराष्ट्रीय संबंध, तत्वज्ञान, संगित अशा सगळ्या विषयांची पुस्तकं ते आवर्जुन वाचतात.
पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करता आहात?
मी सांगतो... घरी पुस्तक वाचत आहे.#StayHomeStaySafe
घरातच थांबा, सुरक्षित राहा! pic.twitter.com/15iswFJIux
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 23, 2020
कुठलंही पुस्तक घेताना आपण त्याच्या 4 ते 5 प्रती घेतो. एक बारामतीत, एक, गाडीमध्ये, एक पुण्यातल्या घरी आणि एक दिल्लीत अशा सगळीकडे आपण पुस्तक ठेवतो. त्यामुळे कुठेही असलो तरी ते सोबत बाळगावं लागत नाही आणि वाचन थांबत नाही असंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
हेही वाचा...