या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिवृष्टी.. हवामान खात्याने दिला 'ऑरेंज अलर्ट'

या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस अतिवृष्टी.. हवामान खात्याने दिला 'ऑरेंज अलर्ट'

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, गडचिरोलीमध्येही अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर नाशिक आणि पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर: मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर बुधवारी मध्यरात्रीपासून ओसरला. मुंबईत पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी गुरूवारी दिवसभरात राज्यात अनेक भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ, गडचिरोलीमध्येही अतिवृष्टी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर नाशिक आणि पुण्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी उद्यापासून (शुक्रवार) नऊ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या शाळांना सुटी जाहीर केली आहे. अतिमहत्त्वाची कामे असल्यासच घराबाहेर पडावे, असाही इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारीदेखील मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे आज हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांना किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर मुंबईकरांनाही गरज पडल्यासच बाहेर पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. खरंतर गेल्या काही दिवस पावसाने चांगलीच दडी मारली होती. पण राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या 8 सप्टेंबरपर्यंत बहुतांश भागात पाऊस असाच सक्रिया राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकल सेवा कोलमडली...

मुंबईसह उपनगरात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुसळधार पावसाचा फटका रस्तेसह रेल्वे वाहतुकीला बसला होता. सायन-कुर्ला-चुनाभट्टीदरम्यान ट्रॅकवर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य रेल्वे पूर्णतः ठप्प झाली होती. मुसळधार पावसाचा इशारा पाहता मुंबई, ठाणे आणि कोकणातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पहाटे सव्वा तीनला अंबरनाथच्या दिशेने पहिली लोकल रवाना

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली तिन्ही मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. पहाटे 3.17 वाजता अंबरनाथच्या दिशेने पहिली लोकल रवाना करण्यात आली. तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकल धावू लागल्या असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे बुधवारी घराकडे पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सीएसएमटीहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे.

सांगलीच्या औदुंबर दत्त मंदिरात शिरले पाणी....

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. नदीची पाणी पातळी 20 फुटावर गेली आहे. त्यामुळे सांगलीच्या औदुंबर दत्त मंदिरात पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कृष्णा नदीचे पाणी आता मंदिराच्या पायथ्याला लागले आहे.

दक्षिण गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपुरशी संपर्क सुरु..

दक्षिण गडचिरोली जिल्हयाच्या पाच तालुक्याना चंद्रपुरशी जोडणा-या आष्टी जवळील वैनगंगा नदीवरील पूल पुराच्या पाण्यात बुडाल्याने रात्री बारा वाजता हा मार्ग बंद झाला होता. मात्र वैनगंगा नदीचा पुर ओसरल्यानंतर हा मार्ग सुरू झालेला आहे आणि यावेळेस वैनगंगा नदीवर पुरामुळै गाळ जमा झाला होता तो गाळ आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचा-यानी गाळासह पुलावरील कचरा स्वतः साफ केल्यानंतर पाच तालुक्याना चंद्रपुरशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सुरु झाला आहे.

VIDEO: पावसानं घेतली उसंत! लोकल सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या