मुंबई, 25 जानेवारी : देशाच्या उत्तरेच्या टोकावर सुरू हिम वर्षावात वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे आणि या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे आणखी वेगाने वाहत आहेत. त्यामुळे शीत वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबईतही पुन्हा एका थंडी वाढल्याचे दिसून आले आहे. मुंबईत काल मंगळवारी 14.8 अंश तापमानांची नोंद झाली.
हवामान विभागाने काय म्हटलं -
15 जानेवारी रोजी मुंबईत यंदाच्या थंडीच्या हंगामातील सर्वात नीचांकीचे किमान तापमान म्हणजे 13.8 अंश नोंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या पंधरवड्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली. मात्र रात्री, पहाटे वातावरणात थंडावा आणि दुपारी उबदारपणा कायम राहिला. यानंतर आता पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. यात पारा 14 अंशावर आला आहे. येत्या काही दिवसात पारा आणखी खाली घसरण्याचा अंदाज आहे. तसेच यंदाच्या हंगामातील नव्या नीचांकीच्या तापमानाची नोंद होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हेही वाचा - ED चे अधिकारी असल्याचे सांगत छापेमारी, मुंबईत 25 लाख रुपये रोख, 3 किलो सोनं लुटलं
उत्तर भारताच्या टोकावर मोठ्या प्रमामावर हिमवृष्टी होत असल्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडावा वाढला आहे. याचमुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. आगामी काही दिवस थंडीचा हा जोर कायम राहणार आहे. मात्र, पश्चिमी झंझावात येत असल्याने तापमानात किंचितशी वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मंगळवारी सांताक्रूझ आणि कुलाबा येथील किमान तापमान अनुक्रमे 14.8 अंश आणि 17.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर, सांताक्रूझ येथे कमाल तापमान 26.5 अंश आणि कुलाबा येथील कमाल तापमान म्हणून 25.5 अंश इतकी नोंद करण्यात आली. दोन्ही केंद्रातील कमाल तापमान हे सरासरी तापमानापेक्षा 4 अंशाने कमी आणि किमान तापमान 1 ते 2 अंशाने कमी असल्याची नोंद करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Todays weather, Weather update