मुंबई, 4 ऑक्टोबर : कोरोनामुळे (corona) गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची (maharshtra school open) दार आज पुन्हा एकदा उघडली आहे. आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackery) यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या. तसंच, 'शाळा सुरू करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे', असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
कोरोनासाठीचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी' या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
'आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमीत चर्चा होत असते. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण होता' असं मुख्यमंत्री म्हणाले.
BCC Recruitment: भंडारा नगरपरिषद इथे 'या' पदांच्या 24 जागांसाठी भरती
शाळा सुरू करतांना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. पावसाळ्यामुळे तसंच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. शिक्षकांना बरे वाटत नसेल आणि शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी अशी सर्व पालक आणि शिक्षकांना या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विनंती केली.
तर, आजपासून शाळा सुरू होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधल्या जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज,त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधन सुविधांनुसार त्याच्या संपादणूक पातळीनुसार त्याची गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
थंड पाण्यानं अंघोळ करता? मग जाणून घ्या फायदे आणि तोटे दोन्ही
'ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.