काँग्रेसची नाराजी दूर, उद्धव ठाकरेंसोबत बैठकीनंतर थोरातांचा महत्त्वाचा खुलासा

काँग्रेसची नाराजी दूर, उद्धव ठाकरेंसोबत बैठकीनंतर थोरातांचा महत्त्वाचा खुलासा

आम्ही एक कुटुंब असून आमच्यात कोणतीही नाराजी नाही'

  • Share this:

मुंबई, 18 जून : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे नेते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अखेर या वादावर आज पडदा पडला आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला चर्चा करायची होती. ती चर्चा अत्यंत सकारात्मक झाली आहे. आम्ही चर्चेतून समाधानी आहोत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज नाही' असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी आज दुपारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  यावेळी बैठकीला खासदार संजय राऊत, अनिल देसाई हे उपस्थितीत होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळपास एक तास बैठक झाली. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

'काही विषय असे असता की, समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही समाधानी आहोत. मागे मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती.  पण रश्मीताई यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे अशा दुखाच्या प्रसंगी भेट घेणे योग्य नव्हते. पण माध्यमांकडून चर्चा रंगवली गेली. आम्ही एक कुटुंब असून आमच्यात कोणतीही नाराजी नाही' असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाचं सावट! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गणेश मंडळांना केलं महत्त्वाचं अपील

तसंच,  'आम्हाला काही विभागानुसार आणि प्रशाकीय समस्येबाबत प्रश्न होते. त्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायची होती. त्यांचेही मत जाणून घ्यायचे होते. कोरोनाच्या परिस्थितीत काय मदत करता येईल, काय उपाययोजना करता येईल. मी स्वत: कोकणचा दौरा केला होता. कोकणात काय मदत करता येईल,अशी त्या मागची भूमिका होती.  त्यामुळे या बैठकीत व्यक्तिगत अशी कोणतीही भूमिका नव्हती'

'जेव्हा सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी आमचे मंत्रिमंडळ तयार झाले होते. मंत्रिमंडळ स्थापन करत असताना समसमान वाटपावर चर्चा झाली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या  जागांसाठी इतकी चर्चा करण्याची गरज नव्हती. लवकरच याबद्दल समसमान पद्धतीने निर्णय जाहीर होईल' अशी माहितीही थोरात यांनी दिली.

'कोणतेही सरकार असले तरी त्यात काही विषय हे निर्माण होतच असतात. इथं आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे हे मोठं कुटुंब आहे. या कुटुंबात काही विषय असतील तर त्यावर चर्चा करून विषय सोडावे लागतात, ते सोडवण्यात आले आहे' असंही थोरात म्हणाले.

भारतीय भूभाग गिळंकृत करणाऱ्या नकाशाला नेपाळमध्ये मिळाली अधिकृत मान्यता

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून काँग्रेस 'कुरकुर करणारी खाट' असल्याची टीका केली होती. असा सवाल विचारला असता, 'या विषयावर आधीच खूप चर्चा झाली आहे. त्यामुळे यावर फार असे काही बोलण्यासारखे नाही. आजच्या बैठकीला खुद्द संजय राऊत सुद्धा हजर होते', असं सांगून थोरात यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

संपादन - सचिन साळवे

First published: June 18, 2020, 4:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या