प्रमोद पाटील, प्रतिनिधी
नवी मुंबई, 21 मार्च : 21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाणारे...इतर शेजारच्या शहरांपेक्षा मुबलक पाणी पुरवठा असण्याचा अभिमान बाळगणाऱ्या नवी मुंबई शहरात पाण्याची भीषण अशी परिस्थितीत आहे. 15 लाखांहून अधिक रहिवासी असलेल्या या शहरात अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या अनियमित आणि तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उन्हाळा सुरू होताच परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. तुर्भे एमआयडीसी परिसरातील रहिवाशांना विशेषत: तुर्भे स्टोअर, इंदिरा नगर,हनुमान नगर,गणेश चुन्नाभट्टी क्वारी,गणपती पाडा, यासह आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) पुरेशा पायाभूत सुविधांचा अभाव आणि एमआयडीसीच्या नियोजनाचा फटका सहन करावा लागत आहे.
एका बाजूला मोरबे धरण आपल्या मालकीचे असल्याचा धिंडोरा पिटणारी महानगर पालिका 24 तास पाणी पुरवत असल्याचा दावा करते. मात्र आपल्याच शहरातील लाखो लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. मोरबे धरणातून 425 दशलक्ष लिटर प्रतिदिन MLD पाण्याचा स्त्रोत घेऊन घणसोली,दिघा,ऐरोली तुर्भे यासह अन्य काही भागांना पाणी पुरवठा करते तर एमआयडीसी कडून 65 MLD पाणी मिळते मात्र हे पाणी नक्की कुठे जाते असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एमआयडीसी कडून येणारे पाणी कधी कधी एक आठवडा येत नाही,आणि आलेच तर रात्री अपरात्री येते,ज्यावेळी नागरिक गाढ झोपेत असतात. मात्र तरीही काही नागरिक पाण्यासाठी रात्र जागवून काढतात. तरीही मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे असा रात्री येणाऱ्या पाण्याचा काय उपयोग असाही प्रश्न नागरिकांना पडतो. यातील अनेक नागरिक आपली व्यथा सांगताना डोळ्यात पाणी आणतात.
स्थानिक रहिवाशी सावित्री पाटील या सांगतात की, माझा उदरनिर्वाह मोलमजुरी करून चालवतो,सकाळी पहाटे कामाला जायला लागतो आणि पाणी रात्री दोन तीन वाजता येते पाणी भरणार कधी,झोपणार कधी आणि सकाळी उठणार कधी आणि कामाला जाणार कधी अशा अनेक समस्या माझ्यासमोर उभ्या आहेत.कधी कधी आठवडाभर पाणी येत नाही त्यामुळे आम्हाला दीड ते दोन किलोमीटर अंतरावर चालत जाऊन पाणी आणावे लागते'
(मुंबईतून आणखी एक कार्यालय दिल्लीला हलवणार, केंद्र सरकारचं ठरलं, काय आहे नेमका निर्णय?)
समाज सेवक महेश कोटीवाल यांनी थेट एमआयडीसी आणि पालिकेवर आरोप करत म्हटले आहे की, 'आम्हाला मिळणारे पाणी एमआयडीसी इतर ठिकाणी वळते करते, इथे असणाऱ्या कंपन्यांना विकते,तर पालिका याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही गंभीर नसेल ते पालिका अधिकारीही यात सामील असल्याचे दिसून येते. किती वेळा आम्ही आंदोलने करायची आणि कितीवेळा पत्र लिहून मागणी करायची आजपर्यंत काहीच प्रतिसाद मिळाला नाही. रात्री अपरात्री आणि कधीतरी येणाऱ्या पाण्यामुळे आमच्या आपसात भांडणे होतात,जी कधी कधी टोकाला जातात,जवळपास नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरात 50 ते 1लाख नागरी वस्ती आहे,ज्यांना आजही पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे.आम्ही पालिकेला कर भरतो त्यांची जबाबदारी नाही का आम्हाला योग्य सुविधा देणे.याबाबत अनेकवेळा तक्रारी आणि पत्र व्यवहार करून झाले आहे,जर एमआयडीसी आणि पालिका मिळून यावर योग्य आणि लवकर तोडगा काढला नाही तर दोन्ही ठिकाणी हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी दिला गेला.
(महाराष्ट्रातले फक्त 16 नाही तर 28 'आमदार' टेन्शनमध्ये! सुप्रीम कोर्टात काय घडलं?)
अतिरिक्त शहर अभियंता पाणीपुरवठा मनोज पाटील यांनी पालिका याबाबत गंभीर असल्याचे सांगून एमआयडीसी कार्यालयात अनेक बैठका घेऊन याबाबत तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी आम्ही संबंधित ठिकाणी पाणी साठवून ठेवता यावे म्हणून मोठ्या टाक्या उभारण्याची योजना आखली असून,दोन ठिकाणी कामेही सुरू केली असून,अन्य ठिकाणीही अशा टाक्या उभारण्याची तयारी आहे,मात्र आता एमआयडीसी याबाबत सकारात्मक होणे गरजेचे आहे.एमआयडीसी दिवसा पाण्याचा स्त्रोत मोरा भाईंदर शहराला सोडते,त्यामुळे येथील नागरिकांना रात्रीचा पाणी सोडला जातो,जो नागरिकांना त्रासदायक आहे. आम्ही याबाबत एमआयडीसीला कळविले आहे की योग्य निर्णय घ्यावा. त्यासाठी आमच्याकडुन काही मदत लागली तर ती केली जाईल.ज्या दिवशी पाणी येत नाही त्या दिवशी आमचे टँकर जातात, मात्र पाण्याचा प्रश्न कायम सुटावा म्हणून एमआयडीसी ने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील अधिकारी राठोड यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे त्यांना पाण्यापासून वंचित नागरिकांना तहानलेले ठेवणेच असल्याचे दिसत असून, एमआयडीसी गंभीर नसल्याचे दिसत आहे.जर एमआयडीसी त्याच्या वाटेचे पाणी इतर ठिकाणी वळते करत असेल तर या नागरीकांचे हक्काचे पाणी त्यांना कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. एमआयडीसी यावर काही तोडगा काढणार आहे की नाही असा संतप्त सवाल येथील रहिवाशी विचारत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.