मुंबई, 4 मार्च : मुंबई महानगरपालिकेला (BMC) शहराच्या बाहेर असलेल्या तलावातून पाणी पुरवठा (Mumbai Water Supply) करावा लागतो. यातील बहुतेक धरणं शहापूर या परिसरात आहे. मुंबई महापालिका साधारणतः दीडशे किलोमीटर लांबीवरून पाण्याचा पुरवठा करते. मुंबई शहरात भरपूर पाऊस पडत असला तरी पाणीपुरवठा मात्र दीडशे किलोमीटर वरूनच करावा लागतो. आता खरं तर यावर्षी जुलै महिन्यापर्यंत मुंबईला पाणीपुरवठा केला जाऊ शकेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये आहे, मात्र तरीही मुंबईतील काही भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बुधवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून या प्रश्नाला वाचा फोडली. विरोधकांसह सत्ताधारी बाकांवरील नगरसेवकांनीही या प्रश्नाबाबत गंभीरता दर्शवली. मुंबईच्या सायन परिसरात काही दिवसांपूर्वी पाणी गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.
या दुरुस्तीच्या कामादरम्यान काहीतरी गोंधळ निर्माण झाला आणि गेले महिनाभर सबंध परिसराला पाणीटंचाई भोगावी लागत आहे. याच प्रश्नाबद्दल बोलताना भाजपा नगरसेविका ज्योती अडवाणी यांनी विलेपार्ले परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष नगरसेवकांसमोर मांडले तर दुसरीकडे अंधेरी परिसरातल्या नगरसेविका राजूल पटेल यांनीही त्यांच्या भागातली समस्या मांडली.
हे वाचा - धक्कादायक! मुंबईत क्लीनअप मार्शलने रिक्षावाल्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
राष्ट्रवादीच्या घाटकोपर पूर्वच्या नगरसेविका आणि गटनेत्या राखी जाधव यांनी या मुद्द्यावर बोलत असताना पंतनगर परिसरातील म्हाडा वसाहतींचा मुद्दा पुढे आणला. या परिसरातील पाण्याच्या पाईप लाईन या म्हाडाच्या मालकीच्या असतात. त्यामुळे महापालिकेला आता दुरुस्त करता येत नाही. त्याचबरोबर ही दुरुस्ती न झाल्यामुळे या परिसरात दूषित पाणी येणे, कमी प्रमाणात पाणी येणे असे प्रकार घडतात, अशी तक्रार त्यांनी केली. त्यामुळे महापालिकेने मुंबईतल्या सर्व म्हाडा वसाहतींच्या पाणीपुरवठ्याची आणि पाइपलाइनच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी असं मत त्यांनी मांडलं.
स्थाई समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सर्वांना चिंता वाटेल असं मत व्यक्त केलं आहे. यशवंत जाधव यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या परिसरात गेले सात दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदार असल्यामुळे सध्या विधिमंडळात अधिवेशनासाठी उपस्थित राहत आहेत. अशावेळी मला स्वतःला पाणी भरण्यासाठी थांबावं लागतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, India, Mumbai, Mumbai muncipal corporation, Water crisis