'महा'वादळ या दिवशी धडकणार ? या किनारपट्टीला धोका, पुढचे 3 दिवस पावसाचे

अरबी समुद्रात निर्माण झालेले 'महा'चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 09:08 AM IST

'महा'वादळ या दिवशी धडकणार ? या किनारपट्टीला धोका, पुढचे 3 दिवस पावसाचे

मुंबई,5 नोव्हेंबर:अरबी समुद्रात निर्माण झालेले 'महा'चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस वादळी पावसाचे असतील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD)दिला आहे.दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 'महा'चक्रीवादळामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा. राजीव गौबा यांनी या संदर्भात महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमणच्या मुख्य सचिवांशीहा संवाद साधला आहे.

अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरित झालेले 'महा' हे वादळ हळूहळू गुजरातच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकू शकते. अरबी समुद्रातले हे वादळ किनारपट्टीच्या दिशेने आले तर त्याचे परिणाम संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जाणवू शकतोत. वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसणाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना याचा फटका अधिक बसेल. यामुळे उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जे मच्छीमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे. चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.

'महा'चा परिणाम

6 नोव्हेंबरला मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला पहाटे हे वादळ गुजरात किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. दीवचा समुद्रकिनारा आणि गुजरातच्या पोरबंदर बंदराच्या दरम्यान हे वादळ जमिनीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत हे वादळ आणखी तीव्र होईल आणि त्यानंतर त्याचा जोर थोडा कमी होत जाईल. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. ताशी 120 किमीपर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला असेल. पुढचे तीन दिवस समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यातही इशारा

5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान पुणे शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह ,विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 6 नोव्हेंबरला 25 ते 35 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असंही हवामानात विभागाचे अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे. 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान पावसाची तीव्रता कमी होईल मात्र ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

VIDEO : चंद्रकांत पाटील आले समोर, सुप्रिया सुळेंनी असं केलं स्वागत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 08:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...