मुंबई, 15 एप्रिल : मुंबईच्या वरळी नाका परिसरात मुंबई पोलिसांनी गर्भवती महिलेला वेळेवर मदत करून तिचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे रुग्णालयात नेताना पोलिसांच्या गाडीतच या महिलेची प्रसुती झाली. वेळेवर मदत केल्यानं महिला आणि तिचं बाळ सध्या सुखरुप आहे. (
Mumbai Police saved life of pregnant woman) याबद्दल पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली आहे. (
Vishwas Nangre patil praises police team)
मंगळवारी 13 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. वरळी नाका परिसरात एका महिला अचानक चक्कर येऊन खाली पडली. ही महिला गर्भवती होती. पोलिसांना वायरलेसवरून याबाबत माहिती मिळताच पोलिसांची मोबाइल 1 आणि मोबाईल 5 ही वाहनं तत्काळ याठिकाणी हजर झाले. महिला गर्भवती असल्याने खाली पडल्यामुळं तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या होत्या. पण त्यावेळी या महिलेबरोबर कुटुंबातील कोणीही नव्हतं. महिलेची प्रकृती बिघडत चालली होती, त्यामुळं त्यांना त्वरित रुग्णालयात नेणं गरजेचं होतं.
या सर्व परिस्थितीचा विचार करून वरळी पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक रेश्मा पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता या महिलेला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सोबत मदतीला कोणीतरी हवं असल्यानं या घटनेच्यावेळी त्याठिकाणी असलेली पादचारी तरुणी प्रिया जाधव हिलाही पोलिसांनी सोबत घेतलं.
(हे वाचा -सरकारचा नवा आदेश, कडक लॉकडाऊनमध्ये आणखी 2 विभागांचा अत्यावश्यक सेवेत केला समावेश )
पोलिसांच्या गाडीतून हे सर्व महिलेला नायर रुग्णालयात घेऊन निघाले होते. पण रस्त्यामध्ये महिलेला अधिक त्रास होऊ लागला होता. महिला पोलीस कर्मचारी आणि सोबत असलेली तरुणी प्रिया या संबंधित महिलेला धीर देत होत्या. पण महिलेच्या प्रसुती कळा वाढल्या होत्या, त्यामुळं नायर रुग्णालयात पोहोचण्याआधीच पोलिसांच्या गाडीतच या महिलेची प्रसुती झाली. या महिलेनं मुलीला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्वरित आई आणि बाळ यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. महिला 7 महिन्यांची गर्भवती होती, त्यामुळं बाळाला दक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मात्र बाळ आणि आई दोघंही सुखरुप असल्यानं पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्यानं सर्वांनी आनंद व्यक्त केला.
(हे वाचा -घराबाहेर पडल्यास कडक कारवाई? पोलिसांना आदेश देताना मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं? )
पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही सर्व घटना नमूद करून पोलिस कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली आहे. ही कामगिरी करणाऱ्या पोलिसांवर अभिमान असल्याचं ते म्हणाले. उपनिरीक्षक रेश्मा पाटील यांच्यासहमहिला कॉन्स्टेबल सपकाळ, एएसआय माने, हेड कॉन्स्टेबल वळवी, कॉन्सटेबल कांबळे आणि लोहार या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.