विवेक गुप्ता, प्रतिनिधी
विरार, 23 जानेवारी : विरार येथील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आरोपीने एका व्यक्तीची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाचे जवळपास 500 तुकडे करून घरातील टाॅयलेटमध्ये टाकून विल्हेवाट केली होती. ही घटना विरार येथील ग्लोबल सिटी येथील बछराज पॅराडाईज सोसायटीमध्ये घडली.
बछराज पॅराडाईज सोसायटीच्या सी विंगमधील ड्रेनेज अचानक तुंबल्यामुळे रहिवाशांनी सोसायटीच्या व्यवस्थपाकांकडे तक्रार केली. जेव्हा ड्रेनेजलाईनची दुरूस्ती सुरू होती, तेव्हा माणसाचे बोट बाहेर पडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सोसायटीच्या व्यवस्थपाकांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली असता, तेही चक्रावून गेले. सोसायटीच्या ड्रेनेजलाईनमधून मानवी मासांचे शेकडो तुकडे सापडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास हे 400 ते 500 तुकडे होते.
फ्लॅटमुळे सापडला आरोपी
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना संशय होता की, आरोपीने हत्या करून त्याचे तुकडे घरातील टाॅयलेटमध्ये टाकून विल्हेवाट लावली असावी. शरीराचे तुकडे-तुकडे झाल्यामुळे मृतदेह हा महिलेचा होता की, पुरूषाचा हे मोठे कोडं पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सोसायटीतील सर्व फ्लॅटची चौकशी सुरू केली. त्यानंतर आरोपीचा शोध लागला. मिंटू शर्मा असं या आरोपीचं नाव आहे. त्याने 15 दिवसांपूर्वीच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. मिंटू शर्माने गणेश कोलटकर याची हत्या केली.
60 हजार रुपयांसाठी हत्या
आरोपी मिंटू शर्माने मृत गणेश कोलटकरकडून 1 लाख रूपये उसणे घेतले होते. गणेशने 1 लाख परत घेण्यासाठी तगादा लावला होता. सुरुवातीला मिंटूने 40 हजार परत केले होते. परंतु, 60 हजार रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे मिंटू शर्माने गणेशची हत्या करण्याचा कट रचला.
तीन दिवस केले मृतदेहाचे तुकडे
गणेशची हत्या करण्यासाठी मिंटू शर्माने एव्हरशाईन एव्हेन्यू सोसायटीमध्ये 15 दिवसांपूर्वी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. मिंटूने गणेशाला पैसे देण्याचा वायदा करून घरी बोलावलं आणि चाकूने वार करून हत्या केली.
हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करण्याचं ठरवलं. त्यानंतर तब्बल 3 दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर घरातील टाॅयलेटमध्ये तुकडे टाकून विल्हेवाट लावली होती.
पोलिसांनी या प्रकरणी मिंटू शर्माला अटक केली आहे. त्याच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
================================================