मुंबई 22 फेब्रुवारी : पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणासोबतच वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नावंही जोडलं गेल्यानं गेल्या काही दिवसांपासून राठोड बेपत्ता आहेत. राज्यभर प्रकरण चर्चेत असल्यानं राठोड नेमकं गेले कुठे असा प्रश्न सर्वांना पडला होता. ते निर्दोष असल्यास समोर का येत नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. अशात आता राठोड सगळ्यांसमोर येण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेले राठोड मंगळवारी पोहरादेवीच्या दर्शनासाठी येण्याची दाट शक्यता आहे. यादृष्टीनं तयारीही राठोड समर्थकांकडून सुरू झाली आहे. बंजारा समाज राठोड यांच्या पाठिशी असल्याचा संदेश देण्यासाठी राठोड समर्थकांनी तयारी सुरू केली आहे. मंगळवारी पोहरादेवीत शक्तिप्रदर्शन करण्याचा राठोड यांच्या कार्यकर्त्यांचा मानस आहे.
व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर राठोड समर्थकांकडून मंगळवारी सकाळी ११ वाजता पोहरादेवीत एकत्र जमण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबद्दलचे मेसेजही व्हायरल होत आहेत.
मेसेजमध्ये काय आहे -
राठोड यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. अन्यथा समाजाचं नुकसान होईल, अशा आशयाचे मेसेज सध्या विविध ग्रुप्सवर व्हायरल करण्यात आले आहेत. संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा, असं आवाहन मेसेजमधून करण्यात आलं आहे. एका व्यक्तीनं किमान १० जणांना सोबत घेऊन राठोड यांच्या स्वागताला उपस्थित रहावं, असा उल्लेख मेसेजमध्ये आहे. त्यामुळे पोहरादेवीत राठोड शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं गर्दी टाळण्याचं आवाहन एकीकडे राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकारमधीलच एक नेता शक्तिप्रदर्शन करणार असल्यानं प्रचंड गर्दी जमणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे, हा विरोधाभासही अनेकांना खटकत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pooja Chavan, Sanjay rathod