मुंबई,5 फेब्रुवारी: महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून पुन्हा वाद झाला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असे आवाहन ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. एकीकडे शिवजयंतीची तारीख आणि तिथीवरून वाद सुरु असताना विनायक मेटे यांनी शिवस्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे आमदार शिवसेनेला डिवचलं..
दुसरीकडे, भाजपचे आमदार नितेश राणेंनीही एकच शिवजयंती झाली पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादीची सत्ता असल्याचं सांगत शिवसेनेला डिवचलं आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय..अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.
उदयनराजेंनीही केला होता सवाल..
काही दिवसांआधीच शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजेंनीही दोन शिवजयंतीवरुन सेनेला सवाल केला होता. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्याच जयंतीवरुन होणारा वाद दुर्देवीच म्हणावे लागेल. आता यावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Latest news, Vinayak Mate