मुंबईत फुकट जागा मिळतेय? ताबा मिळवण्यासाठी शेकडोंची गर्दी

मुंबईत फुकट जागा मिळतेय? ताबा मिळवण्यासाठी शेकडोंची गर्दी

मागील 20 दिवसांपासून नागरिक या ठिकाणी ठाण मांडून बसले असून या ठिकाणाहून ते हलायला तयार नाहीत. या ठिकाणी झोपड्या उभारण्यासाठी त्यांनी साहित्य देखील आणलं असून बांबू आणि इतर साहित्याच्या मदतीने 300 ते 400 स्क्वेअर फुटांमध्ये झोपडी उभारायला सुरुवात देखील केली होती.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : मुंबईतील (Mumbai) विक्रोळी (Vikhroli) येथे राहण्यासाठी फुकट जागा मिळत असल्याची अफवा पसरली आणि या खोट्या बातमीमुळे अनेकांनी या ठिकाणी ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच पोलिसांनी कारवाई केली आणि शेकडोंना ताब्यातही घेतलं. मुंबईत छोट्याशा जागांनाही सोन्याचे भाव आलेले असल्याने कुठे फुकट घर मिळतंय असं म्हटलं, तर गर्दी होणं स्वाभाविकच आहे. असंच दृश्य विक्रोळीमध्ये दिसून आलं.

विक्रोळी आणि कांजूरमार्गच्या दरम्यान असलेल्या भागात सरकारी मालकीचे दोन मोठे भूखंड आहेत. या भूखंडांवर बेघरांना फुकटात जागा दिली जात असल्याची अफवा (fake news) पसरली. सोशल मीडियातून (social media) या संदर्भात एक अफवा पसरली होती. यात ही जागा एका व्यावसायिकाची असून त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलीने ही जागा गरिबांना दान दिली आहे, अशा प्रकारची अफवा पसरल्याने या जागेवर गरजूंनी प्रचंड गर्दी केली. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच जवळपास 400 जणांनी या ठिकाणी गर्दी करत जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई केली.

(वाचा - वाहनांवरील Number Plate बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज)

विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये जेव्हीएलआर लिंक रोडवर (JVLR link road) सरकारचा काही एकरचा भूखंड आहे. मागील 20 दिवसांपासून नागरिक या ठिकाणी ठाण मांडून बसले असून या ठिकाणाहून ते हलायला तयार नाहीत. या ठिकाणी झोपड्या उभारण्यासाठी त्यांनी साहित्य देखील आणलं असून बांबू आणि इतर साहित्याच्या मदतीने 300 ते 400 स्क्वेअर फुटांमध्ये झोपडी उभारायला सुरुवात देखील केली होती. परंतु मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने शनिवारी आणि रविवारी या नागरिकांना या ठिकाणाहून हटवलं.

(वाचा - शेतकरी आंदोलनात Airtel आणि Vodafone Idea कडून खोटा प्रचार; Jio चा आरोप)

दरम्यान, पोलीस आणि महापालिकेच्या या कारवाईनंतर देखील अनेकजण या ठिकाणाहून जाण्यास तयार नसून काही जणांना पोलीस स्टेशनला आणून समज देखील देण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र विकास प्राधिकरणाकडून कोणतीही तक्रार आली नसल्याने कारवाई केली नसल्याचं विक्रोळी पोलिसांनी सांगितलं.

Published by: Karishma Bhurke
First published: December 15, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या