#MeToo : विकास बहलचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

#MeToo : विकास बहलचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

तर कोर्टाने सामंजस्यानं मार्ग काढावा असं सुचवत येत्या शुक्रवारी म्हणजे १९ आॅक्टोबरला बहल, कश्यप आणि मोटवाने आणि बहलवर लैंगिक छळाचा आरोप करणारी फॅंटम माजी कर्मचारी यांना कोर्टात हजर व्हायला सांगितलंय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 17 आॅक्टोबर : मीटू प्रकरणात एका महिलेनं आरोप केलेल्या दिग्दर्शक विकास बहलनं आता फॅंटम फिल्मचे त्याचे माजी सहकारी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांच्या विरोधात मुंबई अब्रुनकसानीचा दावा ठोकलाय. हे दोघेही जण संधीसाधू असून त्यांच्या तथ्यहीन, बदनामी करणाऱ्या वक्तव्यांमुळे माझं मोठं नुकसान झालंय असं म्हणत विकासने १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दोघांविरोधात ठोकलाय.

तर कोर्टाने सामंजस्यानं मार्ग काढावा असं सुचवत येत्या शुक्रवारी म्हणजे १९ आॅक्टोबरला बहल, कश्यप आणि मोटवाने आणि बहलवर लैंगिक छळाचा आरोप करणारी फॅंटम माजी कर्मचारी यांना कोर्टात हजर व्हायला सांगितलंय. पुढील सुनावणी जस्टिस एस जे काथावाला यांच्या चेंबरमध्ये होणार आहे.

बहलनं दाखल केलेल्या याचिकेत कश्यप आणि मोटवाने यांना आपल्या विरोधात प्रसारमाध्यमात किंवा समाज माध्यमात कोणत्याही प्रकारे विधान करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर कोर्टाने या याचिकेत बहलवर अरोप करणाऱ्या संबंधित महिलेलाही प्रतिवादी करण्यात यावं असं म्हटलं. या महिलेच्या आरोपांमुळे हे प्रकरण सुरू झाल्याने तिचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलंय.

आपल्या विरोधात सुरू करण्यात मीटू मोहिमेमागे कश्यप आणि मोटवाने असून फॅंटम कंपनी बंद करण्यासाठी मीच जबाबदार आहे असं हे दोघं भासवत असल्याचा आरोप बहलनं याचिकेत केलाय.

२०११ साली कश्यप, मोटवाने, बहल आणि निर्माता मधू मॅंटेना यांनी फॅंटम फिल्म्सची स्थापना केली. मीटू चळवळीत विकास बहलचं नाव येताच ही कंपनी बंद करण्याचा निर्णय बहल व्यतिरिक्त इतर तिघांनी घेतला.

या कंपनीतील एक महिलेनं २०१५ साली बाॅम्बे वेल्वेट या सिनेमाच्या प्रसिद्धीकरता गोव्यात असताना आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप विकास बहलवर केला आहे. त्यानंतर ही कंपनी बंद करण्याची घोषणा करण्यात आली.

===========================================================

First published: October 17, 2018, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading